कर्करोग परत होऊ नये यासाठी काय आहे उपाय (फोटो सौजन्य - iStock)
रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाचा नेमका प्रकार ओळखून डॉक्टर आता अशा उपचारांची आखणी करतात जे अधिक परिणामकारक असतात आणि ज्यांचे दुष्परिणामही कमी होतात. यामुळे रुग्णाचे प्राण तर वाचतातच, शिवाय उपचारादरम्यान त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होते. डॉ. अम्रित कौर कालेर, कन्सल्टंन्ट, मॉलिक्युलर पॅथॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल्स मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.
कशी आहे उपचारपद्धती
या उपचार पद्धतीच्या यशाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया’ (CML). शास्त्रज्ञांनी या आजाराला कारणीभूत असलेल्या ‘BCR-ABL1’ या जनुकीय दोषाचा शोध लावला. या शोधामुळेच ‘टायरोसिन कायनेज इनहिबिटर्स’ (Tyrosine Kinase Inhibitors) सारखी औषधे तयार करणे शक्य झाले, जी थेट कर्करोगाच्या मुळावर वार करतात. पूर्वी हा आजार खूप जीवघेणा मानला जायचा, पण आता योग्य औषधांमुळे रुग्ण या आजारासोबतही सामान्य आयुष्य जगू शकतात. ते त्यांची कामे करू शकतात, शिकू शकतात आणि कुटुंबासोबत आनंदी राहू शकतात. योग्य उपचारांमुळे जीवनाची गुणवत्ता खूप सुधारू शकते.
World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत
बदललेले स्वरूप
ऍक्यूट मायलॉइड ल्युकेमिया (AML) सारख्या अत्यंत गंभीर रक्ताच्या कर्करोगावरील उपचारांचे स्वरूप देखील आता बदलले आहे. शास्त्रज्ञांनी या आजाराला कारणीभूत असणारे FLT3, IDH1/2 आणि NPM1 यांसारखे जनुकीय दोष शोधून काढले आहेत. या शोधामुळे अशी खास औषधे तयार करणे शक्य झाले आहे, जी थेट आजाराच्या मूळ कारणालाच टार्गेट करतात. अशा वैयक्तिक उपचारांमुळे रुग्णांना औषधांचा चांगला फायदा होतो, आजार जास्त काळ नियंत्रणात राहतो आणि रुग्ण जगण्याची शक्यताही वाढते. यावरून हे सिद्ध होते की, अगदी आक्रमक कर्करोगावरही वैयक्तिक उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरते.
औषधांमुळे नक्की काय होते
त्याचप्रमाणे, MPN (मायलोप्रोलिफेरेटिव्ह निओप्लाझम) या रक्ताच्या आजारात ‘JAK2’ औषधे उपचारांचा मुख्य आधार बनली आहेत. अनेक रुग्णांमध्ये ‘JAK2’ हा जनुकीय दोष आढळतो, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या पेशींचे प्रमाण अनियंत्रित वाढते. यामुळे रुग्णाला सतत थकवा येणे, स्प्लीन वाढणे आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका असतो. नवीन औषधे थेट या दोषावर काम करतात, ज्यामुळे आजाराची लक्षणे कमी होतात आणि आजार वाढण्यापासून रोखता येतो. प्रत्येक रुग्णाच्या आजाराचा प्रकार ओळखून केलेल्या अशा उपचारांमुळे, जुने आजारही आता अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतात.
आधुनिक तपासणी
जागतिक पातळीवर होत असलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलने आता आपल्याकडेच ‘मायलॉइड रिसर्च एसे’ (Myeloid Research Assay) ही आधुनिक तपासणी सुरू केली आहे. ही एक प्रगत ‘नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंग – NGS’ टेस्ट आहे, ज्याद्वारे रक्ताच्या कर्करोगाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या जनुकीय दोषांची माहिती एकाच वेळी मिळते.
या एकाच चाचणीमध्ये ४० महत्त्वाचे जीन्स आणि २९ फ्यूजन पॅनेल तपासले जातात. यात एक्यूट मायलोइड ल्युकेमिया (एएमएल), मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम (एमडीएस), मायलोप्रोलिफेरेटिव्ह निओप्लाझम (एमपीएन), सीएमएल, क्रॉनिक मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया (सीएमएल), आणि ज्युवेनाईल मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया (जेएमएल) यांसारख्या रक्ताच्या मुख्य कर्करोगांचा समावेश होतो. ही चाचणी हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना रोगाचे निदान लवकर आणि अगदी अचूक मिळते. यामुळे गोंधळ कमी होतो आणि रुग्णाला त्यांच्या आजारानुसार योग्य उपचार वेळेत सुरू करता येतात, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
रुग्णाच्या गरजेनुसार उपाय
तज्ज्ञांच्या मते, अचूक निदान आणि आधुनिक औषधांची सांगड घालणे म्हणजे केवळ कर्करोगावर उपचार करणे नव्हे, तर रुग्णाला संपूर्णपणे बरे करणे असते. जेव्हा उपचार रुग्णाच्या गरजेनुसार बदलले जातात, तेव्हा त्याचा सकारात्मक फरक कुटुंबालाही जाणवतो: हॉस्पिटलमध्ये वारंवार जावे लागत नाही, उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्ण लवकर आपले सामान्य जीवन जगू लागतो. अनेक रुग्णांसाठी ही प्रगती सुसह्य दैनंदिन जीवन, भविष्याची नवी आशा आणि आजार पुन्हा उलटणार नाही, हा वाढलेला आत्मविश्वास प्रदान करते.
मायलॉइड रिसर्च एसे’ सुरू करून कोकिलाबेन हॉस्पिटलने रुग्णांच्या सेवेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या उपक्रमामुळे जागतिक दर्जाची ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी’ आता भारतातील रुग्णांसाठी सहज उपलब्ध झाली आहे. रक्ताच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही प्रगती केवळ एक वैद्यकीय शोध नसून, ती भविष्याची एक नवी आशा, दिलासा आणि कर्करोगमुक्त आनंदी आयुष्याची खात्री आहे.






