महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती. विलासराव देशमुख आणि त्यांच्या मुलांचं खूप सुंदर असं नातं होतं. विलासरावांची मुलं अनेक व्यासपीठावर वडिलांच्या आठवणी सांगत असतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त (Vilasrao Deshmukh Birth Anniversary) वडिलांच्या आठवणीत त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh Emotional Post) एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.
रितेश देशमुख हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील अनेक घटना, अनुभव शेअर करत असतो. नुकतंच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यातील फोटोत त्याची दोन्हीही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असल्याचं दिसत आहे. फोटोसोबत त्याने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रितेशने लिहिलं आहे की,“माझ्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात जेव्हा मी एखादी गोष्ट करण्यासाठी असमर्थ आहे असं मला वाटतं किंवा हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी कुणाचा मुलगा आहे याची आठवण स्वत:ला करून देतो. त्यानंतर मी जग जिंकण्यासाठी सज्ज होतो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा. तुमची रोज आठवण येते”, असं रितेशने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश व जिनिलीयाची दोन मुलं विलासरावांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहेत.“काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा… प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो…,” असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया त्यांच्या मुलांवक करत असलेल्या संस्कारांचं कौतुक नेटकऱ्यांनी केलं आहे. काहींनी विलासराव देशमुखांना आदरांजली वाहिली आहे.