फोटो सौजन्य - Social Media
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘रुबाब’ चित्रपटातील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या गाण्याने चित्रपटातील प्रेमळ आणि हळवी बाजू उलगडून दाखवली आहे. संघर्ष, आत्मसन्मान आणि ध्येयाचा प्रवास मांडणाऱ्या ‘रुबाब’मध्ये प्रेमाचा कोमल स्पर्श किती महत्त्वाचा आहे, हे ‘मन जुळले’ या गाण्यातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या गाण्यात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या प्रेमप्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळते. एकमेकांकडे ओढ घेणारी नजर, न बोलता समजून घेणारे क्षण, हळूच उमलणाऱ्या भावना आणि मन जुळल्यानंतर निर्माण होणारी भावनिक जवळीक या सगळ्याच गोष्टी गाण्यात अतिशय नाजूकपणे साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘मन जुळले’ हे केवळ एक रोमँटिक गाणे न राहता, प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाची भावना व्यक्त करणारे गाणे ठरते.
केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर आणि भावस्पर्शी आवाजाने हे गाणे अधिकच खास झाले आहे. त्यांच्या गायकीतील कोमलता आणि हळवेपणामुळे गाणे ऐकतानाच मनात अलगद घर करते. चिनार-महेश यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या संगीतामुळे गाण्याला सुंदर लय लाभली असून, समीर आशा पाटील यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी प्रेमाची गहिरी अनुभूती उलगडून दाखवली आहे. संगीत, शब्द आणि आवाज यांचा हा सुंदर संगम ‘मन जुळले’ला एक भावनिक उंची देतो.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “‘रुबाब’ हा चित्रपट आत्मसन्मान, संघर्ष आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रवासावर आधारित आहे. मात्र, प्रत्येक ताकदवान व्यक्तीमागे एक प्रेमळ आणि संवेदनशील हृदय असते. संभाजी आणि शितल यांच्या नात्यातील नितळ, शुद्ध प्रेम ‘मन जुळले’ या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येते. या गाण्यात भावना, विश्वास आणि मन जुळल्यानंतरची शांत, सुखद अनुभूती स्पष्टपणे जाणवते. प्रेमाची खरी भावना अनुभवण्यासाठी हे गाणे नक्कीच मदत करेल.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते संजय झणकर आणि गौरी झणकर असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रेम, संघर्ष आणि आत्मसन्मानाची गोष्ट मांडणारा ‘रुबाब’ चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘मन जुळले’ या गाण्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.






