‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’मध्ये काम करण्याच्या संधीबाबत स्वरदा म्हणाली की, ‘ताराराणी’ या मालिकेत मला ऑडीशनसाठी कॅाल आला. ऑडीशनसाठी दोन मोठे मोठे पॅच होते.त्यामुळं ऑडीशनला वेळही लागला. दोन दिवस प्रोडक्शन हाऊसकडून काहीच रिप्लाय न आल्यानं मला वाटलं होतं की आता काॅल येणार नाही. दोन दिवसांनी जेव्हा अचानक त्यांचा काॅल आला, तेव्हा खूप आनंद झाला. आपल्याला खूप मोठी संधी मिळाली आहे. महाराणी ताराबाईंचं ऐतिहासिक संधी साकारण्याची सर्वांनाच मिळत नाही. माझ्यासाठी ही संधी चालून आल्यानं याचं मी रोजच सोनं करतेय असं मी म्हणेन. कारण घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठीकाठी या गोष्टी आपण रोजच्या जीवनात स्वत:हून शिकायला जात नाही. त्या गोष्टी मला इथं शिकायला मिळत आहेत. त्या प्रेक्षकांसमोर सादर करायला मिळणं ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कधी ना कधी ऐतिहासिक कॅरेक्टर साकारायला मिळावं अशी इच्छा होती, पण पर्टिक्युलरली हेच कॅरेक्टर साकारायला मिळायला हवं असं कधी वाटलं नाही. मी लहानपणीच घोडेस्वारी शिकले आहे. ॲथलिट असल्यानं माझ्याकडे स्पोर्टसमनशिप आहे. त्यामुळं योद्ध्याचं कॅरेक्टर साकारायला मिळावं असं नेहमी वाटायचं. घोडेस्वारी करताना आपली ॲथलिट पर्सनॅलिटी सादर करणारं ऐतिहासिक कॅरेक्टर साकारायला मिळावं अशी नक्कीच इच्छा होती. ती इच्छा ताराराणींनी पूर्ण केली. या कॅरेक्टरमध्ये जितका जीव ओतण्याचा प्रयत्न करता येईल तितका मी करत आहे.
ॲथलिट पर्सनॅलिटीचा झाला फायदा
मी स्विमिंगमध्ये स्टेट चॅम्पियन असल्यानं बरीच वर्षे स्विमिंग केलं आहे. डिस्ट्रीक्ट लेव्हलच्या स्पर्धांमध्येही खेळले आहे. यासोबतच मी ॲथलिटही होते. लाँग जम्प, रिले यामध्ये मी पारंगत होते. त्यामुळं ॲथलिट पर्सनॅलिटी, खेळभावना आणि जिद्द आजही आहे. ताराराणींची भूमिका साकारताना ॲथलिट पर्सनॅलिटीचा खूप फायदा होत आहे. कारण लख्तरं घालून, ढाल-तलवार घेऊन घोडेस्वारी करणं, दिवसभर लागणारा स्टॅमिना मेंटेंन करण्यासाठी या सर्व गोष्टींची खूप मदत होतेय. कुठे ना कुठेतरी या सर्व गोष्टींचा मला फायदाच होतोय.
घरातच लेखक, गायक, वादक
ॲक्टर हा ऑल राऊंडर असणं खूप गरजेचं असतं असं म्हणतात. ती क्वालिटी माझ्यात असल्यानं ॲक्टर बनण्याचा निर्णय घेतला. केवळ स्पोर्टसमन, डान्सर किंवा सिंगर न बनता आपल्याला सर्वच करता येईल संधी मिळावी यासाठी मी ॲक्टिंगची निवड केली. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये आजोबा चंद्रकांत ठिगळे लिहीतात. आजोबांनी माझ्या नावावर स्वरदा भक्तीसंपदा हे अभंगांचं पुस्तकही लिहिलंय. आजी कुसूम ठिगळे गायची. तिनं अहमदनगर दूरदर्शनवर खूप कार्यक्रमही केले आहेत. माझे बाबा राजेंद्र ठिगळे यांना सर्व प्रकारची वाद्ये वाजवतात. गिटार, हार्मोनियम, फ्लूट, बेंजो, सिंथेसायझर अशी बरीच वाद्यं ते अगदी सहजपणे वाजवतात. त्यामुळं लेखन, गायन आणि अभिनय माझ्या रक्तात आहेच. लहानपणापासून डान्स आणि सिंगिंगमध्ये इंटरेस्ट असल्यानं ॲक्टरच बनले. आमच्या घरामध्ये सिनेनिर्मितीचं पूर्ण पॅकेज आहे.
…तेव्हा अंगावर काटा आला
महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई आणि राजाराम यांच्या पत्नी होत्या, इतकंच मला सुरुवातीला ताराराणी यांच्याबद्दल माहित होतं. कोल्हापूरमध्ये आपण त्यांचे फोटोज वगैरे पहातो. माझी आई कोल्हापूरचीच असल्यानं थोडी फार माहिती होती, पण त्यांच्या कारकिर्दीबाबत काहीच माहित नव्हतं. त्या योद्ध्या होत्या, युद्ध लढल्या होत्या, औरंगजेबाविरुद्ध त्यांनी इतका मोठा लढा पुकारला वगैरे… त्यामुळं मला जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा मी गुगल केलं आणि त्यांच्याबाबत जाणून घेतलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व नेमकं काय आहे हे जाणून घेतलं, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. हि खूप मोठी संधी असून, अतिशय मोठं आव्हान असल्याचं जाणवलं. हे आपल्याला जमेल, नाही जमेल, कसं करायचं असे बरेच प्रश्न मनात आले, पण मी फक्त इतकाच विचार केला की, या आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला १०० टक्के योगदान द्यायचं आहे. जास्त विचार करायचा नाही असं ठरवलं.
त्यामुळं सीन छान फुलतो
पहिल्या दिवशी मी जेव्हा सेटवर गेले, तेव्हा दिग्दर्शकांना सांगितलं की मी कोरी पाटील आहे. मला काहीच माहित नाही. तुम्ही मला मार्गदर्शन करा. चालण्या-बोलण्यापासून सुरुवात करायची होती. हे व्यक्तिमत्त्व कसं चालेल, त्याचा पेहराव कसा असेल हे जाणून घेतलं. या कॅरेक्टरवर संपूर्ण रायगडासोबत स्वराज्याचीही जबाबदारी होती. या जाणिवेमुळं एक वेगळा ऑरा तयार झाला होता. सरांनी खूप गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांना सर्व माहिती आहे. लहान सहान गोष्टींचा बारकाईनं अभ्यास केला असल्यानं प्रत्येक वाक्याचा संदर्भ ते सांगायचे. जेव्हा तुम्हाला प्रत्येक वाक्यामागचा संदर्भ समजतो, तेव्हा त्याची इन्टेन्सिटी आणि इमोशन्स आपोआप बाहेर येतात. त्यामुळं सीन खूप छान फुलतो आणि पाहताना तो प्रेक्षकांशी कनेक्ट होतो. एखादा ॲक्टर जोपर्यंत त्या वाक्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांसोबत कनेक्ट होऊ शकत नाही. शिरीषसर, काशिदसर, भरतदादा हे सर्व मदत करायला तत्परच असतात.
कुटुंबियांना अभिमान
माझं जन्मस्थान सातारा असून, बाबांचं गाव अहमदनगर आहे. ‘माझे मन तुझे झाले’ ही माझी पहिली मराठी मालिका. त्यानंतर आठ वर्षे हिंदीतच काम केलं. ‘सावित्री देवी कॅालेज अँड हॅास्पिटल’, ‘प्यार के पापड’, ‘नागिन’, ‘शौर्य और अनोखी की कहानी’ या हिंदी मालिका केल्या. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ करत असल्यानं घरातील सर्वांना खूप आनंद झाला असून, त्यांना माझा अभिमान आहे. आई-बाबा पुण्याला असतात. तिथे सर्वजण मराठी मालिका आपुलकीनं पाहिल्या जातात. मध्यंतरी मी हिंदीत बिझी होते. त्यामुळं मी मराठी शो कधी करणार असं ते विचारायचे. आता ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ करत असल्यानं ते खूप खुश आहेत. सर्वांच्या प्रतिक्रिया फोन करून कळवत असतात. त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेच.
प्रेरणादायी ताराराणी
ताराराणींचं कॅरेक्टर साकारण्यासाठी इतिहास वाचल्यावर खूप गोष्टी समजल्या. व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणी या त्यांच्या क्वालिटी आजच्या युगातही उपयोगाच्या असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. आपण लहान मुलांना इतिहास शिकवतो, पण ते वाचतात आणि विसरतात. टिव्हीवर जेव्हा एखाद्या मालिकेच्या माध्यमातून इतिहास पाहिला जातो, तेव्हा त्यांना इत्तंभूत माहिती मिळते. त्यांच्या लक्षात रहातो. त्यांचा पेहराव, वागणं, बोलणं, युद्धनीती समजते. स्त्री असूनही ताराराणींनी औरंगजेबासारख्या प्रवृत्तीशी लढा दिला. त्या काळी त्यांना काही गोष्टींसाठी पाठींबा होता, तर काहींना विरोध होता. त्यांना सामोरं जात ताराराणींनी औरंगजेबाचा नायनाट केला. आजच्या युगात प्रत्येक स्त्रीला कोणत्या ना कोणत्या वळणावर असे औरंगजेब भेटत असतात. त्यांच्याशी कसं डील करायचं हे समजेल. पुरुषांनीसुद्धा ही मालिका बघावी. कारण त्या काळी पुरुषांनीही ताराराणींना साथ दिली होती. तशीच आजही त्यांनी स्त्रियांना साथ द्यावी. औरंगजेबांसारख्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढाव्यात. हे सर्व पाहता ताराराणींचं व्यक्तिमत्त्व सर्व स्त्रियांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगावंसं वाटतं.