फोटो सौजन्य - Social Media
निसर्गाची अवकृपा, सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे Risod तालुक्यातील भोकरखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव शंकर रंजवे यांनी २३ जानेवारी रोजी गावालगतच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत लेकीच्या लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव न झाल्याने शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले. अशा दुर्दैवी घटनांमुळे तालुक्यातील शेतकरी संकट अधिक गडद होत चालले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने अनेकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. मात्र, आत्महत्येनंतरही शेतकरी कुटुंबांची यातना संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात या मदतीचा लाभ मिळण्यात मोठा विलंब होत आहे. नामदेव रंजवे यांच्या कुटुंबाला दोन वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारस प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, इतर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दिरंगाईमुळे मदत मिळालेली नाही.
‘कागद आणा, सही आणा, पुन्हा या’ अशा उत्तरांनी एका दुःखी विधवेच्या जखमांवर मीठ चोळले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा नेमकी कुणासाठी काम करते, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अशा कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, श्रवणबाळ योजना, निराधार योजना तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत मदत मिळेल, अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतरही शशिकला रंजवे यांना आर्थिक मदतीसाठी भटकंती करावी लागत आहे. अल्पभूधारक असलेल्या रंजवे कुटुंबाकडे अत्यल्प शेती असून सलग नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. बँकेचे कर्ज आणि खासगी सावकारांचा तगादा यामुळे नामदेव रंजवे मानसिकदृष्ट्या खचले आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. घटनेला दोन वर्षे उलटूनही कुटुंबाला न्याय न मिळाल्याने विधवा पत्नीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची भेट घेतली आहे. आता तरी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






