हैदराबाद – दक्षिणेतील अभिनेता विजय देवराकोंडाची (Vijay Deverakonda) ईडीने तब्बल नऊ तास चौकशी (ED Inquiry) केली. देवराकोंडा सकाळी हैदराबाद (Hyderbad) येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचला. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘लायगर’ (Liger) चित्रपटासाठी फंड सोर्सिंगशी संबंधित फेमा (Foreign Exchange management Act) च्या चौकशीच्या संदर्भात ईडीसमोर हजर झाला.
लोकप्रियता मिळवण्याचे काही दुष्परिणाम आणि समस्याही असतात. जेव्हा मला एजन्सीने चौकशीसाठी बोलावले, तेव्हा मी माझे कर्तव्य पार पाडले. ईडीने मला पुन्हा फोन केला नाही, असे ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर विजयने सांगितले.
यापूर्वी १७ नोव्हेंबर रोजी चित्रपटाची निर्माती चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांचीही परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. देवरकोंडाने ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हिंदीत बनलेल्या या चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये आहे. काँग्रेस नेत्या बक्का जुडसन यांनी तक्रार दाखल केली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा दावा त्यांनी केला. या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.