आज सायंकाळपासून पुणे नगर रोड बंद (फोटो- istockphoto)
1 जानेवारी रोजी आहे विजयस्तंभ शौर्य दिन
देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी होतात दाखल
पुणे-नगर हायवेवरील वाहतूक वळवणार
कोरेगाव भीमा: शिरूर येथे १ जानेवारी २०२६ या दिवशी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी इथे येत असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ३१ डिसेंबर सायंकाळ पासून पुणे नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पेरणेफोटा येथील पुणे नगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून या मार्गा वरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ०१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यत पर्यत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर ते न्हावरा फाटा नंतर न्हावरा तून पारगाव केडगाव चौफुला मार्गे यवत सोलापूर रोडने हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. तर पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे मार्गे खराडी तून हडपसर मार्गे सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला हून पारगाव मार्गे न्हावरा ते शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील. आणि मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व माल वाहतुक वाहने वडगाव मावळ मार्गे तळेगाव दाभाडे ते चाकण, खेड, नारायणगाव हून आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.
मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने त्यामध्ये कार, जीप इत्यादी वडगाव मावळ मार्गे तळेगाव दाभाडे हून चाकण ते खेड, पाबळ तसेच शिरुर मार्गे अहमदनगर कडे जाणार असून अभिवादन साठी येणाऱ्या अनुयायांची वाहने लोणीकंद व शिक्रापूर येथील नियोजित पार्किंग मध्ये लावून बसेस ने विजयस्तंभ परिसरात सोडण्यात येणार आहे.






