‘झी सिनेमा’वर (Zee Cinema) येत्या शनिवारी ८ ऑक्टोबरला रात्री ८.०० वाजता ‘रनवे ३४’ (Runway 34) या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर (World Television Premier) आहे. त्यात अखेरच्या प्रसंगापर्यंत प्रेक्षकांना सतत थरार, गूढ आणि उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळतील. नियमांच्या बाहेर जाऊन विमानातील प्रवाशांचे जीव वाचविल्यानंतरही कॅप्टन विक्रांतला चौकशीला सामोरे जावे लागते. त्याने घेतलेला विमानाला उतरविण्याचा निर्णय योग्य होता का? न्यायालयाचा निकाल काय असेल? विक्रांत आपल्या निर्णयाचे योग्य प्रकारे समर्थन करू शकेल का आणि त्याला पुन्हा विमान चालविण्याची संधी मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर चित्रपट बघितल्यानंतरच मिळतील.
चित्रपटात अजय देवगण हा कॅप्टन विक्रांतच्या भूमिकेत आहे. अमिताभ बच्चन हे तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. शिवाय त्यात रकुलप्रीत सिंग ही अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून कॅरी मिनाती आणि अंगिरा धर याही विशेष भूमिकेत दिसतील.
‘रनवे ३४’मध्ये हवेतील थरार लवकरच न्यायालयीन चौकशीच्या नाट्यात बदलताना दिसतो. या चित्रपटात अजय देवगण याने केवळ प्रमुख भूमिका तर साकारली आहेच शिवाय या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शकही अजय देवगण आहे. झी सिनेमावर शनिवारी नव्याने प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा प्रीमिअर असतो. येत्या शनिवारी ‘रनवे ३४’ या चित्रपटाच्या प्रीमिअरमुळे अजय देवगणच्या चाहत्यांना पर्वणीच मिळाली आहे.
‘रनवे ३४’ हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. खराब हवामानामुळे आणि मर्यादित इंधनामुळे इमर्जन्सी लॅण्डिंग केलेल्या एका विमानाच्या कॅप्टनची कथा यात सादर करण्यात आली आहे.