नयनांना शांतवून सुखावणारा. सृजनाचं, नवोन्मेशाचं, समृद्धीचं प्रतिक असणारा. एकाच वेळी शांतवणारा आणि चेतना जागवणारा, आयुष्याच्या अस्तित्वाचा रंग आहे हा हिरवा… निसर्गात सर्वाधिक आढळणारा…
हिरवा रंग डोळ्यासाठी ही उत्तम आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. म्हणूनच शांतता आणि संतुलितपणाचा संगम तुम्हाला यात पाहायला मिळेल. तसेच हा रंग निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. म्हणूनच घराच्या सजावटीत हिरव्या रंगांचा वापर जास्तीत जास्त करायला काही हरकत नाही. हिरव्या रंगाने घरात प्रसन्नता निर्माण होत असते.
अमेरिकेत हिरवा रंग समृद्धीचा मानला जातो. म्हणूनच की काय त्यांच्या डॉलरचा रंग हिरवा आहे. इस्लाममध्ये हा एक पवित्र रंग म्हणून तर भारतामध्ये हा रंग शुभकार्याची सुरुवात व वृद्धीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. आणि म्हणूनच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ते तुम्हा आम्हा सगळ्यांना भावणारा, जगात दुसऱ्या नंबरवर असलेला हा रंग…
जगभरात सुरक्षिततेसाठी प्रमाण मानला गेलेला गती दर्शक आणि म्हणून सिग्नलमध्ये वापरला जाणारा हा हिरवा रंग. या रंगाला स्त्रियांच्या भावविश्वात तर विशेष स्थान आहे. हिरवा चुडा, डोहाळ जेवणाची हिरवी साडी, तिच्या जीवनातल्या प्रत्येक मंगल प्रसंगाशी निगडीत आहे हा….
असा हा शांतवणारा हिरवा रंग ज्यांच्या आयुष्याशी सगळ्यात जास्त निगडीत आहे ते आपले शेतकरी आणि त्यांच्या स्त्रिया. त्यांच्या आयुष्यात कितपत शांतता आहे? कसं आहे या आपल्या हिरव्या सख्यांच आयुष्य? थोडा विचार करुया.
हरित क्रांती या शब्दांतच समृद्धीची किती जादू आहे. ही क्रांती घडवणारा आपला शेतकरी… सध्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. परंतु त्याच्या आत्महत्येनंतर एकटीने शेतीचा आणि संसाराचा गाडा हाकणाऱ्या शेतकरी महिलांचे प्रश्न उजेडात येतात का? पतीच्या पश्चात कुणाला सासरच्या मंडळींनी घरातून हाकलून देतं तर कुणी शेतीत कसत असूनही जमिनीच्या वाट्यातून उपेक्षित रहात…
विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, मराठवाड्याच्या गायरान जमिनी कसणाऱ्या, पण जमिनीचे हक्क नाकारलेल्या शेतकरी महिला, वन जमिनीवर वर्षानुवर्षे राबूनही जमिनीच्या हक्कासाठी झगडणाऱ्या कोकणातील शेतकरी महिला आणि पतीच्या पश्चात सासरच्या मंडळींनी शेतजमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या शेतकरी महिला… त्यांच्यापैकी अनेक जणी शेतातच राबणाऱ्या आहेत. कायद्याप्रमाणे त्या माहेरच्या किंवा सासरच्या शेतजमिनीच्या वारसदार आहेत. परंतु लग्नानंतर माहेरच्यांनी त्यांचे हक्क काढून टाकलेले आणि पतीच्या पश्चात सासरच्यांनी ते नाकारलेले, अशा कात्रीत सापडलेल्या शेतकरी महिलांचे अनेक प्रश्न….
असं रोजचं जीवनचं एक संग्राम असणाऱ्या या आपल्या हिरव्या सख्या… पण आपल्यापासून कोसो दूर… न थकता, न हरता रोज नव्याने आयुष्याला सामोऱ्या जाणाऱ्या या रणचंडिका…
इथे आज एक नाव आवर्जून घ्यावंस वाटतं, ते म्हणजे “पद्मश्री -बिजमाता – राहीबाई पोपरे”! देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा वसा घेतलेल्या स्त्री शेतकरी!
दुर्गेचं हे एक आगळे हिरवे रुप… आज स्त्री शक्तीचा जागर करताना या हिरव्या रुपाचीही आठवण ठेऊया का?…

रश्मी पांढरे
– रश्मी पांढरे (9881375076)






