बऱ्याचदा सकाळी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, मग त्या व्यक्तीला प्रश्न पडतो की रात्रीची पूर्ण झोप घेऊनही त्याला सकाळी थकवा का वाटतो. एवढेच नाही तर यामुळे दिवसभर उर्जेचा अभाव निर्माण होतो आणि दिवसभर आळस कायम राहतो. यामागील झोप पूर्ण न होणे हे एकमेव कारण नाही तर त्यामागे काही गंभीर आजारही कारणीभूत ठरू शकतात. याबाबत आपण अधिक माहिती या लेखातून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर निखिल वत्स यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)
अनेकदा सकाळी उठल्यानंतर अगदी झोप पूर्ण होऊनही शरीरामध्ये थकवा जाणवतो. याकडे दुर्लभ करू नये कारण याची कारणं काही गंभीर आजारही ठरू शकतात, जाणून घेऊया
जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. जेव्हा शरीरात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असते तेव्हा त्याचा शरीराच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या तक्रारी उद्भवतात
थायरॉईडमुळे सकाळी थकवा येऊ शकतो. हायपोथायरॉईडीझममुळे शरीरातील चयापचय मंदावतो, ज्यामुळे ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा, वजन वाढणे, मूड बदलणे आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात
सकाळी अशक्तपणा येण्याचे एक कारण मधुमेहदेखील असू शकते. मधुमेहात शरीरातील ग्लुकोजचे संतुलन बिघडते, ज्यामुळे पेशींना ऊर्जा मिळत नाही. यामुळे व्यक्तीला थकवा, चिडचिड आणि अशक्तपणा जाणवतो
स्लीप एप्निया हा एक गंभीर झोपेचा विकार आहे ज्यामुळे झोपेच्या वेळी व्यक्तीचा श्वास वारंवार थांबतो. यामुळे, व्यक्तीला चांगली आणि गाढ झोप येत नाही, ज्यामुळे त्याला सकाळी थकवा जाणवतो
या सगळ्या आजारांवर वेळीच उपाय केल्यास सकाळी उठल्यावर थकवा येणार नाही. त्यासाठी तुम्ही त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा, याकडे दुर्लक्ष करू नये