सहा बहिणींची कथा मांडणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर रिलीज
‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा चित्रपट आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. या चित्रपटाचा टीझर (Baipan Bhari Deva Teaser) एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. आज 28 एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) महाराष्ट्रभरात रिलीज झाला असुन त्यांचाच आगामी बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ याचा टीझर ही आज एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.