South Africa (Photo Credit- X)
South Africa Team ICC Fine: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दारुण पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका जिंकली होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने 414 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त 72 धावांवर संपला. इंग्लंडने 342 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. एकदिवसीय सामन्यांमधील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे.
इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आयसीसीने धक्का दिला. आयसीसीने संघातील सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या शुल्कातून 5 टक्के कपात केली. सामन्यादरम्यान संथ ओव्हररेट राखल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी हा निर्णय दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे होता. आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी सामन्याच्या शुल्काच्या पाच टक्के दंड भरावा लागतो.
Heaviest ODI defeat and ICC fine: South Africa’s misery continues in England pic.twitter.com/2zXMSZzijR
— Gags (@CatchOfThe40986) September 8, 2025
अंपायर नितीन मेनन, रसेल वॉरेन, शराफुद्दौला इब्ने शाहिद आणि माइक बर्न्स यांनी हा आरोप केला होता. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कर्णधार टेम्बा बावुमाने आपली चूक मान्य केली आहे आणि शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती.’
या सामन्यात इंग्लंडकडून जो रूट आणि जेकब बेथेलने शतके झळकावली. याशिवाय जोस बटलरने स्फोटक अर्धशतक झळकावले. सलामीवीर जेमी स्मिथनेही अर्धशतक झळकावले. गोलंदाजीत इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने चार विकेट्स घेतल्या. त्याने बॅटिंग पॉवरप्लेमध्ये 5 षटके टाकली आणि 5 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. संघाने केवळ 24 धावांत 6 विकेट्स गमावल्या. त्यानंतरही संघ 72 धावांवर पोहोचला. हा दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय सामन्यातील दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे.