शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. मोरिंगा पावडरचा वापर दैनंदिन आहारात केला जातो.मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मोरिंगा पावडरचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले कॅल्शियम, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मात्र काही लोकांच्या आरोग्यासाठी मोरिंगा पावडर अतिशय घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी मोरिंगा पावडर अतिशय घातक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते मोरिंगा पावडर
गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. पण या दिवसांमध्ये चुकूनही मोरिंगा पावडरचे सेवन करू नये. या पावडरच्या सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. याशिवाय नऊ महिन्यांच्या आधीच प्रसूती होण्याची शक्यता असते.
कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी मोरिंगा पावडरचे सेवन करू नये. यामुळे रक्तदाब आणखीनच कमी होऊ शकतो. चक्कर येणे, अशक्तपणा आणि बेशुद्धी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
मधुमेह असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात मोरिंगा पावडरचे सेवन करतात. पण या पावडरचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्तच कमी होऊ शकते.
थायरॉईडसंबंधित समस्यांपासून त्रस्त असलेल्या रुग्णांनी मोरिंगा पावडरचे सेवन कमीत कमी प्रमाणात करावे. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते. याशिवाय हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझ इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
मोरिंगा पावडरमध्ये ऑक्सॅलेट्स अधिक प्रमाणात आढळून येते, जे कॅल्शियमसोबत मिक्स झाल्यामुळे किडनी स्टोन वाढू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी मोरिंगा पावडरचे सेवन करावे.