एका साधूच्या श्रापामुळे देव निर्बल झाले होते. याचा परिणाम त्यांच्या सामर्थ्यावर झाला. असुरांशी झालेल्या युद्धात देव हारले. शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी देवांनी श्री विष्णूंचा आश्रय घेतला. तेव्हा देव आणि असुर मिळून क्षीरसागराचे मंथन करण्याचा सल्ला श्री विष्णूंनी दिला. या मंथनात मंदराचल पर्वत "मंथनदंड" म्हणून वापरण्यात आला आणि वासुकी नाग हा "मंथनाची दोरी" म्हणून घेण्यात आला.
समुद्रमंथन कसे झाले? (फोटो सौजन्य - Social Media)

मंथन करताना पर्वत समुद्रात ढासत जाऊ लागला. तेव्हा स्वतः श्री विष्णूंनी कासवरूपी कूर्म अवतार घेत, पर्वताला पुन्हा वर आणून स्थिर करण्याचे कार्य केले.

मंथनाला पुन्हा सुरुवात झाली. डाव्या बाजूने असुर तर उजव्या बाजूने देव त्या वासुकीला खेचत होते. या मंथनात अनेक जणांची निर्मिती झाली.

मंथनातून तयार झालेले विष भगवान शंकराने आपल्या कंठात ठेवले आणि नीलकंठ झाले. मग कामधेनू म्हणजेच स्वर्गीय गाय! याची निर्मिती झाली.

पाहता -पाहता त्यातून ऐरावत हत्ती, उच्चैःश्रवा घोडा, कल्पवृक्ष (इच्छापूर्ती वृक्ष) अशा अनेक दैवी वस्तूंची निर्मिती झाली. मग मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाल्या. ते सौंदर्य पाहून देव आणि असुर, अगदी सगळेच मोहित झाले. प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्थ झाला पण देवी लक्ष्मी श्री विष्णूंच्या साधेपणावर आकर्षित झाले आणि त्यांना वरमाला दिली.

त्यातून वारुणी देवी, चंद्र देव तसेच धन्वंतरी वैद्याची निर्मिती झाली. धन्वंतरी वैद्यांच्या हातात अमृत होते. असुरांनी ते घेतले. त्यांनतर श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेत, असुरांना भुरळ पडत त्यांच्याकडून ते अमृत घेतले आणि देवांच्या हवाले केले. अशा प्रकारे देवांनी ते अमृत प्राषण केले. तसेच त्यामुळे अमर झाले.






