लग्न म्हणजे सर्वच मुलींच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय दिवस. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच लग्नाची तयारी सुरु केली जाते. लग्नात किंवा इतर सर्वच शुभ कार्यांमध्ये हातांवर सुंदर सुंदर मेहंदी काढली जाते. मागील अनेक वर्षांपासून लग्नाच्या आधी नववधूच्या हातांवर मेहंदी काढण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ हिंदू धर्मातच नाहीतर सर्वच धर्मांमध्ये पाळली जाते. मेहंदी काढणे अतिशय पवित्र मानले जाते. मेहंदीचा रंग अतिशय गडद झाला तर नवऱ्याचे खूप जास्त प्रेम मुलीला मिळते, असे घरातील वडीलधारे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला लग्नाआधी हातांवर मेहंदी का काढली जाते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नाआधी नववधूच्या हातांवर मेहंदी का काढली जाते?
मेहंदीची गणना १६ अलंकारांमध्ये केली जाते. लग्नात नवरीचे हात हिरव्या बांगड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी हातांवर सुंदर सुंदर डिझाईनची मेहंदी काढली जाते.
लग्नात मेहंदी काढण्याच्या परंपरेला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मागील पाच हजार वर्षांपासून मेहंदीचा वापर हातांवर किंवा पायांवर काढण्यासाठी केला जात आहे.
धार्मिक ग्रंथांमध्येही मेहंदीचा केल्याचा उल्लेख आहे. १२ व्या शतकात भारतात आणलेल्या मुघलांची ही भेट मानली जाते.पूर्वीच्या काळी शाही घराण्यातील स्त्रियासुद्धा मेहेंदी काढत होत्या.
मेहंदीचा संस्कृत अर्थ 'मेधिका' आहे. मेहंदी ही शरीरकलेचा सर्वात जुना प्रकार मानली जाते. सुंदर राजकुमारी क्लियोपात्रा तिच्या शरीराला रंग देण्यासाठी पूर्वीच्या काळी मेहंदीचा वापर करत होती.
नववधू लग्नाच्या आधी हातांवर मेहंदी काढतात. मेहंदीचा रंग जितका चमकदार असेल तितका नवविवाहित जोडप्यासाठी भाग्यवान असते, अशी समज आहे.