राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालाचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह इतर महत्त्वाच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील हेवेदावे विसरुन पुन्हा एकदा एकत्रित लढत देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठे विधान केले होते. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या खांद्यावर दिली असल्याचे मोठे विधान खैरेंनी केले. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच राज्यामध्ये मनसे व शिवसेनेची युती होणार का यावरुन देखील भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “याबाबत चंद्रकांत खैरे यांना फोन करून विचारा. मी तुम्हाला सांगतो की यामध्ये कोण काय बोलतंय? कोणावर काय जबाबदारी आहे? यापेक्षा हे महत्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलो आहोत की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी जे कोणी पक्ष बरोबर यायला तयार आहेत, आम्ही त्यांना बरोबर घेऊन हा लढा देऊ”, असं सूचक भाष्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “अदानी समूह असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल हे मुंबई आणि महाराष्ट्र गिळंकृत करायला निघालेले आहेत. अनेक अत्याचारांच्या घटना या महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणते पक्ष लढत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे’, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युतीमध्ये येणार असण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे ते घडेल. संकेत नाही, काही दिवसांत बातमी देईन. तसेच त्यांच्या शिवसैनिकांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही”. उद्धव ठाकरे यांच्या विधानापूर्वी राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संदीप देशपांडे म्हणाले होते की, सध्या दोघांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. प्रस्ताव आल्यानंतर राज ठाकरे विचार करतील. मागच्यावेळी आमचे तोंड भाजले आहे. त्यामुळे यावेळी आम्ही ताक सुद्धा फुंकून पिऊ, असे सूचक विधान संदीप देशपांडे यांनी दिले होते.