राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार जाणार की उद्धव ठाकरेंना संधी मिळणार यावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाणाऱ्या नेत्याबाबत देखील भूमिका मांडली आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा खासदारकीबाबत वक्तव्य केले होते. त्यांनी रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान केले. तर त्यासाठी शिवसेनेकडे संख्याबळ असल्याचाही दावा केला. त्यामुळे राज्यसभेसाठी शरद पवार यांना सोडून उद्धधव ठाकरे पुढे येतील अशी चर्चा सुरु झाली. य़ाबाबत खासदार राऊत म्हणाले की, “आधी निर्णय तर होऊ द्या. महाविकास आघाडीची राज्यसभेसाठी एकच जागा आहे. तेवढे संख्याबळ आमच्याकडे आहे,” असे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले.
हे देखील वाचा : राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक
पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीचे तीन पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे हे ठरवतील. अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे, आदित्य ठाकरे जे बोलले ते योग्य आहे. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते राज्यसभेतून निवृ्त्त होत आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तीन पक्षांनाच मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बोलणे निरर्थक असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग
उद्धव ठाकरे यांना राज्यसभेसाठी पाठवले जाणार का यावरुन चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधीत्व मिळावं असं वाटणं हे सहाजिक आहे. तीन पक्ष एकत्र बसून एकमताने निर्णय घेऊ. महाराष्ट्र हिताचा निर्णय घेऊ. काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईत होतो. जर राज्यसभेसाठी कोण कुर्बानी देणार त्याला विधान परिषदची जागा मिळणार, काँग्रेसची विधान परिषदेसाठी आमदार पाठवण्याची इच्छा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेवर जाणं थोडं कठीण आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.






