Photo Credit- Social Media अंबादास दानवेंची शिंदे गटावर टिका
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचे सरकार स्थानप झाले. पण या सत्तांतरापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या. खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्रीपद वाटपापर्यंत शिंदे गटाच्या नेत्यांना डावललं जात असल्याचे बोलले जाऊ लागले. तेव्हापासून एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या बैठका आणि सभांना अनुपस्थित राहण्यास सुरूवात केली. हे सर्व सुरू असतानाच काल देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्याने एकच खळबळ उडाली.
या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधत एकनाथ शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. नव्या सरकारमध्ये शिंदे आणि त्यांच्या पक्षाची सुरू असलेली फरफट पाहून अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “शिंदे गटाने आता डावलले जाण्याची सवय करून घ्यावी, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी एक्सवर ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. ” 1. आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद. 2. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद. 3. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बाद. सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे,” असं ट्विट करत दानवेंनी आपल्या ट्विटमधून शिंदेंना डिवचलं आहे. ज्यातील पालकमंत्री नियुक्ती आणि खातेवाटपापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या विविध दौर्यांना, मंत्रिमंडळ बैठकींना व कार्यक्रमांना गैरहजेरीमुळे ही नाराजी आणखीनच स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा मुद्दा हलक्यात घेत, शिंदे यांचा चेहरा नेहमीच गंभीर असतो, याचा अर्थ नाराजी असा नाही असे सांगितले. मात्र, दोघांमधील पूर्वीचे बॉन्डिंग आता तणावात असल्याचे बोलले जाते.
शिंदे यांनी स्वतः “आपत्ती असो, संकट असो, मी तिथे असतोच!” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, या विषयावर आता फडणवीस यांनी गंभीरपणे विचार सुरू केला असून, शिंदे यांना पुन्हा समितीत स्थान देण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा आहे.निवडणुकीपूर्वी युतीतील अंतर्गत मतभेद उघड होणार का? शिंदे यांची भूमिका भविष्यात काय असेल?राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!