संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला
25 जून 1975 रोजी तत्कालीन सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारच्या म्हणण्यानुसार, त्या काळात सत्तेचा गैरवापर झाला आणि सामान्य नागरिकांना अन्याय व दडपशाहीचा सामना करावा लागला. म्हणूनच, केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.
यावरूनच आता आधीचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आता भाजप मध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्ट टाकून याविषयी भाष्य केले आहे. यावरून मोठा गदारोळ उडाला असून आता काँग्रेसकडून अशोक चव्हाणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीची निर्दय गळचेपी’; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला
अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिले कि, “लोकशाहीचा श्वास आणि संविधानाचा पाया मजबूत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण सर्व मिळून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प करूया.” यावेळी त्यांनी #संविधानहत्यादिवस असा हॅशटॅगही वापरला.
लोकशाहीचा श्वास आणि संविधानाचा पाया मजबूत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण सर्व मिळून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प करूया.#SamvidhanHatyaDiwas pic.twitter.com/Dgme6HqxEP — Ashok Chavan (@AshokChavan1958) June 25, 2026
अशोक चव्हाणांच्या ट्विटर पोस्टनंतर काँग्रेसच्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. “मा. अशोकराव, ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा राबवताना आपल्याच रक्ताशी आपण गद्दारी करत नाही ना, हे ही स्वतःला एकदा विचारून बघा,” अश्या शब्दात अशोक चव्हाणांवर टीका करण्यात आली.
मा. अशोकराव,
ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा… https://t.co/OMT5vUgLa8 — Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 25, 2026
पंतप्रधान मोदींनीही ‘संविधान हत्या दिन‘ चा उल्लेख करत ‘X ‘ पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “”आज आपण अशा सर्व व्यक्तींना आदरांजली अर्पण करत आहोत ज्यांनी भारताच्या इतिहासातील एका अत्यंत काळ्या अध्यायात – म्हणजेच ‘आणीबाणी’च्या काळात – लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण केले. आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट आघात होता. या काळात नागरी स्वातंत्र्ये स्थगित करण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली, तसेच राजकीय नेते, पत्रकार आणि समाजसेवक यांना अटक करण्यात आली; इतकेच नव्हे तर आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांवरही प्रहार करण्यात आला.”
Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक
ते पुढे म्हणाले, “या काळात असंख्य नागरिकांनी दाखवलेले असाधारण धैर्यही दिसून आले; ज्यांनी गप्प राहण्यास नकार दिला आणि आपल्या संविधानातील आदर्शांची जोपासना केली. आपल्या सर्वांसाठी, आपले संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, अधिकार आणि कर्तव्यांचे प्रतीक आहे. घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामूहिक कटिबद्धतेचा आपण पुनरुच्चार करतो. संविधानाच्या भावनेने प्रेरित होऊन, आपण असा भारत घडवू जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.”






