'एक तर 150 पेक्षा जास्त किंवा १० पेक्षा कमी जागा जिंकू'; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Bihar Assembly Election 2025: २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (PK)यांनी एक मोठे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “जनसुराज पक्ष एकतर १० पेक्षा कमी जागा जिंकेल किंवा १५० पेक्षा जास्त जागा जिंकेल,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, “बिहारमधील लोक गेल्या अनेक दशकांपासून निराश आहेत. राज्य आता एका मजबूत पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे बिहारचे लोक जन सुराज पक्षाकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. परंतु मतदान करताना मतदारांनीही विश्वास ठेवून मतदान केलं पाहिजे. जर जनतेने विश्वास दाखवला तर निकाल आश्चर्यकारक असतील. ही निवडणूक त्यांच्या चळवळीवरील जनतेच्या विश्वासाची खरी परीक्षा असेल.”
Rohit Arya Viral Video: ‘तो वैकुंठला गेला तर…’; रोहित आर्यच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल
तुम्ही स्वतः निवडणूक का लढवत नाही, असे विचारले असता, प्रशांत किशोर म्हणाले की, “मी कधीही निवडणूक लढवण्याचा माझा हेतू जाहीर केला नाही. मी म्हटले होते की जर मी निवडणूक लढवली तर मी कारगहरमधून निवडणूक लढवीन. पण पक्षाचा विजय किंवा पराभव माझ्या निवडणुकीवर अवलंबून नाही. मी एक्स-फॅक्टर नाही; खरी शक्ती लोकांकडे आहे.” जन सुराज पक्षाचे यश कोणत्याही व्यक्तीने नव्हे तर लोकांच्या पाठिंब्याने ठरवले जाईल.
प्रशांत किशोर म्हणाले की, “बिहारचे राजकारण आतापर्यंत महाआघाडी आणि एनडीए या दोन ध्रुवांपुरते मर्यादित राहिले आहे, परंतु जनतेला आता बदल हवा आहे. त्यांच्या मते, अंदाजे एक तृतीयांश मतदारांना महाआघाडी किंवा एनडीए नको आहे. हे मतदार भविष्यात जन सुराजला बळकटी देऊ शकतात. जन सुराज पक्ष १६० हून अधिक जागांवर त्रिपक्षीय स्पर्धा देण्याच्या स्थितीत आहे आणि ही निवडणूक राज्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते.” असा दावाही त्यांनी केला आहे.
संस्थापक प्रशांत किशोर यांनी सांगितले की, जन सुराज हा केवळ राजकीय पक्ष नसून बिहारच्या पुनर्बांधणीसाठीची एक सामाजिक चळवळ आहे. सत्ता मिळवणे हे या चळवळीचे उद्दिष्ट नसून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत प्रशासनाच्या संस्कृतीत सुधारणा घडवणे हेच खरे ध्येय आहे. गेल्या दोन वर्षांत ‘जन सुराज पदयात्रेद्वारे’ राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याची भेट घेतली असून, या प्रवासादरम्यान आम्ही लोकांच्या समस्या जवळून समजून घेतल्या असल्याचे सांगितले.
“१४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर जनतेने जन सुराजवर किती विश्वास ठेवला आहे हे स्पष्ट होईल. जर लोकांनी या चळवळीवर विश्वास दाखवला, तर बिहारच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला जाईल. लोक जेव्हा जुन्या राजकारणाच्या चौकटीतून बाहेर पडून नवीन विचारसरणी स्वीकारतील, तेव्हाच खरा बदल घडू शकतो,” असे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.






