'सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अधिकार भाजपचाच होता, पण...'; मंत्री गोरेंचं मोठं विधान (संग्रहित फोटो)
सातारा : ”भाजप हा सर्वांत मोठा पक्ष असल्याने अध्यक्षपदाचा नैसर्गिक अधिकार आमचाच होता. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र यावे, अशी आमची भूमिका होती. मात्र, निकालानंतर काहींनी अहंकार दाखवत आमची चेष्टा केली. हा जिल्हास्तरावरील विषय असून, राज्यात आम्ही महायुतीत एकत्र आहोत”, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षानंतर भाजप नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या भूमिकेचे समर्थन करत यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मंत्री गोरे म्हणाले, निवडणुकीदरम्यान काही मंत्र्यांकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आजही काहींनी झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीवेळी येथे सुरुवातीपासून अनाधिकाराने उपस्थित राहून उपस्थित पोलिस व अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केली.
तसेच, आज प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी केला, हे सर्वांना माहिती आहे. योग्य वेळ आल्यावर त्यावर सविस्तर बोलू. येथे घडलेल्या कोणत्याही अनुचित प्रकारांशी भाजपचा कसलाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांच्या टीकेवर गोरे म्हणाले…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेबाबत प्रतिक्रिया देताना गोरे म्हणाले, ”ते मोठे नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. आमच्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांना आहे.” निकालानंतर विरोधकांनी पराभव मोठ्या मनाने स्वीकारून नव्याने निवड झालेल्या अध्यक्षा प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप विसरुन त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज होती; मात्र तो दिसून आला नाही. तरीही आम्ही महायुतीचे घटक पक्ष असल्याने हा विषय अधिक ताणाताणीचा होणार नाही.
शिवेंद्रसिंहराजेंची विरोधकांवर जोरदार टीका
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही भाजपच्या विजयाचे समर्थन करत विरोधकांवर टीका केली. ”काही सदस्यांनी स्वखुशीने भाजपला मतदान केले. विरोधक आपले अपयश झाकण्यासाठी आरोप करत आहेत. कोणत्याही सदस्याला धमकावण्याचा प्रश्नच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या सत्तासंघर्षात भाजपने प्रभावी रणनीती राबवत अध्यक्षपद पटकावले. निवडणुकीत २७ जागा जिंकून तसेच एका अपक्षाच्या पाठिंब्याने २८ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजपला मतदानावेळी तब्बल ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना ३० मते मिळाली. विरोधकांनी आपल्याच सदस्यांनी आपल्याला का डावलले? यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
भाजपसाठी मतदान करणारे सदस्य
बुध गट – लता कर्णे
गुणवरे गट – ऋतुजा जगताप
खेड – कामेश कांबळे
कुमठे – हणमंतराव जगदाळे
सातारा रोड – सारिका जगदाळे
मतदान करू न शकलेले सदस्य
अनिल देसाई – कुकडवाड गट
संदीप मांडवे – नागठाणे गट
हेदेखील वाचा : Rupali Chakankar News : भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?






