
माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात; महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
माळेगाव : आगामी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शनिवारी (दि.२२) श्री भैरवनाथ महादेवाच्या दर्शनाने आणि अभिषेकाने मंगल वातावरणात झाला. महायुतीतील सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येतील उपस्थिती पाहून माळेगावचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उपस्थितांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नेतृत्त्वाकडून “हा जनसमुदायच आमची खरी ताकद आहे,” असा संदेश देण्यात आला.
बारामतीकरांनी आजपर्यंत दाखविलेल्या विश्वासाचा उल्लेख करत, “जनतेनं मला प्रतिनिधी म्हणून नेहमीच साथ दिली; त्याच विश्वासानं या निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना देखील जनता निश्चित पाठिंबा देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या महायुतीकडून सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन जाण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित करण्यात आला. “ही निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही… तर माळेगावच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी आहे,” अशी भावना व्यक्त करत मतदारांनी योग्य उमेदवारांची निवड करून गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीने सुयोग सातपुते यांच्यावर विश्वास टाकला असून, “माळेगावचा मतदार राजा निश्चितच त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल,” अशी खात्री व्यक्त करण्यात आली.
यावेळी माळेगावच्या विकासाचा रोडमॅप सुद्धा लोकांसमोर मांडण्यात आला. नगरातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, नियोजनबद्ध रस्ते व पाणीपुरवठा, नवीन शासकीय इमारती, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन या सर्वांची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ता आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांमध्ये ‘एक नंबरची नगरपंचायत’ माळेगावची व्हावी, हा आमचा दृढ संकल्प आहे,” असे सांगत महायुतीकडून विकासाचा बिगूल वाजवण्यात आला.
राष्ट्रवादी जनमत आघाडीची प्रचाराला जोरदार सुरुवात
दुसरीकडे, माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात राष्ट्रवादी जनमत आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, गावात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: “उपाध्ये, भंडारी या निष्ठावंतांच्या दुःखात…”; बिनविरोध निवडणुकीवरून रोहित पवारांचा घणाघात