धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
CJP on PM Modi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधील कार्यक्रमात मोदी यांनी ‘दिमागी नक्सल’ हा शब्द वापरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या वक्तव्यावरून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. देशातील युवक प्रश्न विचारत असतील, तर त्यांच्याकडे संवादाच्या माध्यमातून पाहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सोशल मीडिया पोस्टमध्ये दास यांनी म्हटले की, देशातील प्रमुख महाविद्यालयांपैकी एका ठिकाणी जाऊन प्रश्न विचारणाऱ्या युवा पिढीला ‘दिमागी नक्सल’ म्हणणे हे धक्कादायक आहे. विशेषतः शिक्षण दिनाच्या निमित्ताने असे वक्तव्य होणे अधिक गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी युवकांना नवीन आशा आणि विश्वास देण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने देशभर आंदोलन उभे केल्याचा दावा केला आहे. या आंदोलनानंतर जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाची बैठक झाली.
या बैठकीनंतर पक्षाने सध्या निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्सल’ या शब्दप्रयोगावरून पक्षाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदींच्या भाषणावर आशुतोष रांका यांनीही टीका केल्याचे या प्रकरणात सांगण्यात आले आहे.






