कॉंग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय युती करण्याबाबत वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई/दिल्ली : महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्रित येत आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता राजकारण तापले आहे. मराठी माणसांचा आज मीरा भाईदर येथे भव्य मोर्चा देखील झाला. या मोर्चापूर्वी पोलीस आणि आक्रमक आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाली. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची वाढती जवळीक लक्षात घेता त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे.
मराठी हिंदी वाद व निशिकांत दुबेच्या वादग्रस्त वक्तव्यावर रमेश चेन्नीथला दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या प्रश्नावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की उद्धव-राजची युती होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणुकीतील घोटाळ्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७५ लाख मतदान कसे वाढले, हाच प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. निवडणुक आयोग हा भाजपासाठी काम करत असून निवडणुकीत कूकर्म करून विजय मिळवला आहे. आता बिहारमध्येही तेच सुरु आहे. बिहारमध्ये २ कोटी मतदारांचा प्रश्न आयोगाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे आणि आयोग हे सर्व भाजपाला फायदा व्हावा यासाठी करत आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता हवी पण आयोगाची भूमिकाच संशयास्पद आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागू,’ असेही चेन्नीथला म्हणाले आहेत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मराठी माणसांनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले. अविनाश जाधव म्हणाले की, आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या कोणी नादाला लागेल तर लक्षात ठेवा, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिला आहे.