‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवत मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी दोन वेळा आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा नव्याने अर्ज केला आहे. मात्र, परवानगी मिळो अथवा न मिळो, मुंबईला जाणारच आणि गरज पडली तर एकटाच आझाद मैदानात आंदोलन करणार, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान होईल,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
आंदोलनाला परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जरांगेंचा अर्ज पोलिसांनी याआधी नाकारला असून, आता त्यांनी पुन्हा अर्ज केला आहे. या अर्जावर पोलीस निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, सध्या मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जात असल्याने या उत्सवाला कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे यांनी यापूर्वीही आंदोलन केलं आहे आणि भविष्यातही आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं. मात्र, यावेळी सरकारने जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
जी मागणी मान्य करता आली नाही, त्यामागे कायदेशीर अडचणी आहेत, हेही जरांगेंना समजावून सांगितल्याचं फडणवीस म्हणाले. न्यायालयीन बाबींच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्यास त्याचा फटका थेट मराठा समाजाला बसू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून त्यांना आंदोलनाचा निर्णय पुन्हा विचारात घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे फडणवीसांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे आपल्या मुंबई आंदोलनाच्या भूमिकेवर पुनर्विचार करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.






