‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; सतीश सालियान वकिलांसह दाखल
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. शनिवारी दुपारी ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर ही कायदेशीर नोटीस देण्यात आली.
सतीश सालियन यांनी यापूर्वीच आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याच संदर्भातील नोटीस देण्यासाठी ते वकिलांसोबत मातोश्रीवर पोहोचले होते.
मातोश्रीवर येण्यापूर्वी सतीश सालियन यांनी माध्यमांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. ‘मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही,’ असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. त्यांच्यासोबत वकिलांची पूर्ण टीम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सतीश सालियन मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईही मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरेंच्या बाजूने नोटीस स्वीकारण्यासाठी अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे मातोश्रीच्या गेटवर उपस्थित होते.
मातोश्रीबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. शिवसैनिकांनी सतीश सालियन यांना आत प्रवेश देण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नोटीस प्रत्यक्ष घरात देण्याऐवजी गेटवरच स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली.
या प्रकरणात आदित्य ठाकरेंना तब्बल 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली असून त्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.
दिशा सालियन प्रकरणात याआधीही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे. आता कायदेशीर नोटीस आणि 500 कोटींच्या दाव्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. पुढे या नोटीसवर आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






