(Stock Photo - Social Media)
Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मोदी आणि शिंदे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही.
मात्र, आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासोबतच राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीत पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघ महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने आधीपासूनच दावा केला होता.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागा भाजपच्याच असल्याचं म्हटलं होतं. तर मंत्री जयकुमार गोरे यांनीही महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं सांगताना, गरज पडल्यास भाजप म्हणूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. यानंतर अपेक्षेप्रमाणे या दोन्ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आल्याचं चित्र आहे.
मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावरून आता महायुतीमध्येच नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेनेचे मंगेश चिवटे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनीच मंगेश चिवटे यांना पुणे विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनीही चिवटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. पुणे शिक्षक मतदारसंघावर आमचा दावा आहे आणि येथून मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी भूमिका सामंत यांनी मांडली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीतील जागावाटप, पुणे शिक्षक मतदारसंघावरील महायुतीतील दावे आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यांवर चर्चा झाली का, याबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे मोदी-शिंदे भेटीनंतर पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत कोणता निर्णय होतो, याकडे महायुतीतील घटक पक्षांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मंगेश चिवटे यांची उमेदवारी कायम राहणार का आणि भाजप-शिवसेनेतील हा पेच कसा सुटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






