
Eknath Shinde dasara melava speech
Shivsena Dasara Melava : दसरा जवळ आला कि महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून होणाऱ्या दसरा मेळाव्याबद्दल मोठी उत्सुकता असते. त्यातही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईत येतात. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठीही शिवसेनेच्या दोन्हीही गटांनी जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही मुंबईत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होणार हे निश्चित असून सेनेच्या दोन्ही गटांच्या नेत्यांची धडाकेबाज भाषणे ऐकायला मिळणार आहेत. अश्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला असून मेळाव्याच्या आयोजनात मोठा बदल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमका कसा रंगणार, याची उत्सुकता वाढली आहे.
दसरा मेळाव्यात दरवर्षी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात राजकीय शक्तिप्रदर्शन केलं जातं. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कोणाचा मेळावा सरस ठरतो अश्या प्रकारची स्पर्धा एकप्रकारे पाहायला मिळते. यासाठी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळते. मात्र, यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मेळाव्यामध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात मोठा बदल केल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. दरवर्षी या मेळाव्यात सेलिब्रिटींचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र, यंदा या कार्यक्रमांना फाटा देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यंदाच्या मेळाव्यात थेट भाषणांना सुरुवात होणार असून, साधारण दोन ते अडीच तासांत कार्यक्रम संपवण्याचं नियोजन असल्याची माहिती आहे. म्हणजेच, यंदा मनोरंजनापेक्षा राजकीय भूमिका आणि नेत्यांच्या भाषणांवर अधिक भर असणार आहे.
गेल्या वर्षी पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात आली होती. यंदा दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांना मदत देण्याची तयारी शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मेळाव्याच्या राजकीय भाषणांसोबतच या मदतकार्याचीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाकडून पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात हुकूमशाहीला दणका देण्यासाठी आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी एल्गार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधणार आणि आगामी राजकीय घडामोडींवर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यांसोबतच नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम, नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा आणि भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडेही लक्ष असणार आहे.
एकूणच, यंदा दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत. आता कोणत्या नेत्याच्या भाषणातून कोणता राजकीय संदेश दिला जातो आणि कार्यकर्त्यांची किती गर्दी जमते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
Ans: यंदा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स रद्द करून थेट भाषणांवर भर दिला जाणार असल्याची माहिती आहे.
Ans: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे.