फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये सर्व पक्षांची विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. पक्ष, नेते आणि कार्यकर्ते जोरदार कामाला लागले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटप आणि त्याच्या फॉर्मुला जुळवण्याची धडपड सध्या सुरु आहे. त्यामुळे राज्यामध्ये निवडणूकीला पुरक अशी वातावरण निर्मिती देखील झाली आहे. यानंतर आता विधानसभेसाठी निवडणूक आयोग देखील कामाला लागले आहे. आयोगाकडून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी मुख्य अधिकारी हा अहवाल मागवणार आहेत. यामुळे राजकीय पक्ष, नेते यांच्या तयारीला वेग आला आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून विधावसभेचा कार्यक्रम आणि नियोजन जाहीर होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.
‘या’ गोष्टींचा आढावा घेणार
याआधी निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू व काश्मीर या राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मागील 15 वर्षांपासून हरियाणा व महाराष्ट्राची निवडणूक एकाच वेळी होत आली आहे. आता आयोग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, पुणे, कोकण, मुंबई शहर आणि उपनगरचा दूरदृश्यप्रणालीद्वारे हा आढावा घेतला जाणार आहे. 13 सप्टेंबरला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा असणार आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन, मतदान कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्र, बूथ केंद्राचा प्रस्ताव, मतदार यादी, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष, नोडल अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेले ‘ॲप’ची स्थिती, वाहतूक व्यवस्था, टपाल मतदान प्रक्रिया आदींचा आढावा यात घेतला जाणार आहे.
यंदाची निवडणूक रंगणार
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी पक्ष नाही तर राज्यातील नागरिक देखील उत्सुक आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर वेगळ्याच युती निर्माण झाल्या आहेत. शिंदे गट व अजित पवार गट यांच्यासाठी यंदाची विधानसभा प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी घेतलेला निर्णय जनतेला किती पटला याचा आरसा दाखवणारा ठरणार आहे. तर महाविकास आघाडी म्हणून देखील ही आघाडी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे एकमेकांसोबत प्रचार, जागावाटप आणि नाराजी नाट्य यामधून कसे ध्येय गाठणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता देखील सर्वांना लागली आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार हे निर्विवाद आहे.