(फोटो- सोशल मिडिया)
मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. यावरून महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांवर कुरघोड्या करू लागले आहेत. अश्यातच, भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे विधान केले होते. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत राजकीय बदलांबाबत भाकितांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.
उलथापालथ व्हायला काही भूकंप थोडीच आहे? जे व्हायचे ते ठरलेले असते आणि पुढे काय होते, ते आपण पाहूच, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. कोणाच्या भविष्यवाणीमुळे राजकीय बदल घडतात, असे आपण मानत नसल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वजण मिळून सामूहिक निर्णय घेतात, तेव्हाच असे बदल होतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान वाढवून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपावर गुलाबराव पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.
नानाभाऊंना हा मुद्दा तीन वर्षांनंतरच कसा सुचला? त्यांनी त्याचवेळी याबाबत बोलायला हवे होते, असे पाटील म्हणाले. नवीन मुद्दे पुढे आणण्याची ही धडपड असल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबाबतही गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आले. हा सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्याशी संबंधित अंतर्गत विषय असल्याचे सांगत, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थखात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांची आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबाबत बोलताना, ते मित्रपक्षात गेले असून महायुतीचाच प्रचार करतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील जागावाटपाचा निर्णय महायुतीचे नेते एकत्र बसून घेतील, असेही त्यांनी सांगितले.
कर्जत-भीमाशंकर पट्ट्यातील टोरेंट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्याच्या मुद्द्यावर पाटील यांनी पर्यावरण आणि विकास या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. झाडे वाचली पाहिजेत आणि विकास प्रकल्पही झाले पाहिजेत. या दोन्हींमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सरकार करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.






