'जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार,' गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. “गणपती उत्सवात विघ्न म्हणजे मनोज जरांगे यांचे विघ्न”, असं म्हणत आपण या आंदोलनाला वैचारिक विरोध करत असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.
जरांगे हे रिअॅलिटी शोमधील कलाकार असून त्यांचे प्रोड्युसर एकनाथ शिंदे, तर उदय सामंत डायरेक्टर असल्याची उपमा सदावर्ते यांनी दिली. त्यांच्या आंदोलनाला राजकीय झालर असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या उपोषणावरही उपरोधिक शब्दांत टीका केली.
लातूर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत सदावर्ते यांनी शिक्षणाच्या अधिकाराचा दाखला दिला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असेल, तर प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अंतरवाली सराटी परिसरातील विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यात अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असंविधानिक असल्याचा आरोप करत बाल आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सदावर्तेंनी केली. आंदोलनामुळे व्यापारी, कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
आंदोलनादरम्यान रस्ते रोखले जात असल्याने रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना अडचणी येतात, पेट्रोल टँकरसह इतर वाहतुकीवर परिणाम होतो, असा दावा सदावर्ते यांनी केला. वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे सामान्य कुटुंबांचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारने जरांगे यांच्याशी चर्चेसाठी उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांनाच पाठवावं, अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही सदावर्तेंनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळातील DJ बंदीच्या मुद्द्यावरही सदावर्तेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्त्यांवरील मारहाणीचं समर्थन करत नसल्याचं सांगतानाच, गणेशोत्सवाच्या काळातच DJ आणि डेसिबलचा मुद्दा का उपस्थित केला जातो, असा सवाल त्यांनी केला.
DJ बंदीचा निर्णय उत्सवाच्या काही दिवस आधी न घेता वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वपक्षीय आणि सर्व समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करून घ्यावा, अशी सूचना सदावर्तेंनी केली. “आमच्या गणेशोत्सवात विघ्न नको”, अशी भूमिका मांडत कोणत्याही सणाच्या उत्सवात जाणूनबुजून अडथळा आणू नये, असंही त्यांनी म्हटलं.
पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली जात असल्यास पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.






