File Photo : Manoj Jarange
जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी अंतरवली सराटी मध्ये आमरण उपोषण सुरु केले होते. 17 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतला होता. आज त्यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस होतो. आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.
मराठा समजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणापत्रासह ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मागील वर्षभरापासून जरांगे पाटील या मागणीसाठी आंदोलन करत आहे. सभा, मोर्चा आणि आमरण उपोषण करुन आपली मागणी राज्य सरकारपुढे केली. त्यानंतर काल रात्री (दि. 24) माजी मंत्री राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. आज सायंकाळी 4 वाजता ते उपोषण सोडणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम समाजाची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केल्यापासून मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील बांधव अंतरवलीकडे रवाना होत होते. या सर्व लोकांना आणि मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आाहे. मला 10- 12 दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, असं जरांगे म्हणाले. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही हाताने सत्ता घालवू नका,” असे थेट मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला. त्यांनी सुरुवात केली. शेवट मात्र मराठ्याचे करणार आहेत. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही. कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले तसे करायचे. न्यायालयाच्या सल्ल्यानुसार, आता उपचार घेऊन नंतर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 वाजता किंवा 5 वाजता उपोषण सोडू, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.