
Jalgaon DCC Bank Election
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार फिल्डिंग लावली असून बिनविरोध निवडींचा धडाका पाहायला मिळत आहे. 21 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आतापर्यंत 12 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेवर महायुतीची पकड मजबूत होताना दिसत आहे. (Jalgaon DCC Bank Election 2026)
विशेष म्हणजे, या निवडणुकीत केवळ मंत्री आणि दिग्गज नेतेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात घराणेशाहीची चर्चा रंगू लागली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपापल्या जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. जामनेर मतदारसंघातून महाजन यांच्याविरोधात उभे असलेले तुकाराम विठोबा निकम यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाजन यांचा मार्ग मोकळा झाला.
दुसरीकडे, गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनीही माघार घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. युतीधर्म पाळण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नेत्यांच्या कुटुंबीयांची बिनविरोध निवड. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, खासदार उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम, जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांचा यामध्ये समावेश आहे.
तसेच आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील व पत्नी मृणाल पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या सहा, भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. आणखी एका जागेच्या बिनविरोध निवडीचा तपशीलही अंतिम यादीत स्पष्ट होणे आवश्यक आहे.
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या देवयानी देशमुख यांचा अर्ज कायम असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
आता उर्वरित नऊ जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार असून जळगाव जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Ans: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी निवडणूक होत आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या 12 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सहा, भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन जागा निवडून आल्या आहेत.
Ans: मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचीही बिनविरोध निवड झाली आहे.