अबू आझमी यांच्याविरोधात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचे विधीमंडळात एकत्रित आंदोलन केले आहे (फोटो - एक्स)
मुंबई : राज्यामध्ये विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महायुती सरकार आल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून अधिवेशन गाजत आहे. आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे चर्चेमध्ये आले आहेत. अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन आता राजकारण तापले असून विधीमंडळामध्ये देखील याचे पडसाद दिसून येत आहेत.
समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायले. यामुळे राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधकांनी या मुद्द्यांवरुन विधीमंडळाच्या आवारामध्ये आंदोलन झेडले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन झेडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाटी क्लिक करा
यावेळी अबू आझमी यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाजारांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारी ते कोरटकर सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि पोस्टर दाखवण्यात आले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केलेल्या या आंदोलनाला सत्ताधारी नेते असलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५
दिवस तिसराछत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. तसेच… pic.twitter.com/MWA3ATVzK3
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 5, 2025
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, आताच्या या घडीला मी त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहत नाही. विरोधकांनी पायऱ्यांवर जे आंदोलन सुरु ठेवलं आहे त्याबद्दल सत्तेमध्ये असून सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्यांची प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. वारंवार ही घाणेरडी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये जन्म घेते आहे. मग ते भगतसिंग कोश्यारी असो किंवा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यासारखी नीच प्रवृत्तीच्या लोकांना भरचौकात फाशी देऊन अडकवले पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमोल मिटकरी देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे. ज्यांना महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे त्या प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर अशी सर्वांचा राग सलत आहे. अमोल मिटकरी यांना माझा काहीही सल्ला नाही. ते त्यांच्या विचारधारेवर कायम राहिले पाहिजेत, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. मात्र अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले आहे.