Buldhana Fodder Shortage
बुलढाणा: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पशुधनासाठी आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनासह सर्व घटकांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. (Buldhana)
Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आ. संजय रायमुलकर यांच्यासह जलसंधारण, मृद व जलसंधारण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत आगामी काळातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पशुसंवर्धन विभागामार्फत चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे किंवा नाही, याची माहिती कृषी सहाय्यक व तलाठ्यांमार्फत संकलित करावी. चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करावी. ग्रामस्तरावर चारा लागवडीचे नियोजन करून भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
खरीप हंगामात पावसाची झालेली तूट आणि त्याचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता चारा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार तसेच अन्य पिकांचे अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन करावे. चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, चाऱ्याची योग्य साठवणूक आणि पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत प्रशिक्षण व जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा यांचा विचार करून भविष्यातील गरजेनुसार नियोजन करावे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी. आगामी काळात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी दिले. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, विविध विभागांच्या योजना आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करावी.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुकास्तरावर विविध विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. नद्यांचे खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, नाले खोलीकरण, पांदण रस्त्यांची निर्मिती, शेततळ्यांची निर्मिती तसेच माथा ते पायथा जलसंधारणाची कामे यांचे सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध योजनांच्या माध्यमातून ही कामे प्रभावीपणे राबवून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात अडविणे व जमिनीत जिरविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.






