भाजपची ‘सेफ गेम’ रणनीती; सदस्य सहलीवर, सत्ता समीकरणांवर सस्पेन्स कायम
भाजपचे १६, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षाचा प्रत्येकी एक असे एकूण १८ सदस्य सोमवारी कोल्हापुरात एकत्रित दाखल झाले. सुरुवातीला ‘एकत्रित जेवण’ असा संदेश देण्यात आला; मात्र नंतर दोन दिवस एकत्रित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सदस्य फुटू नयेत आणि संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठीच ही रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीनेही आपले सदस्य यापूर्वीच अज्ञातस्थळी हलवून ‘सुरक्षितता कवच’ तयार केले आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. ६१ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३१ आकड्याची गरज असताना महाविकास आघाडी ३० सदस्यांवर थांबली आहे, तर भाजप व मित्रपक्ष मिळून १८ सदस्यांपर्यंत मर्यादित आहेत.
अजित पवार गटासोबत महाविकास आघाडीने केलेल्या समझोत्यामुळे सत्तेची समीकरणे अधिकच रंगतदार झाली आहेत. अध्यक्षपदाच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद शरद पवार गटाला, तर सव्वा वर्षानंतर अजित पवार गटाला देण्याचा फॉर्म्युला पुढे आला आहे. यासंदर्भात मंगळवारी निर्णायक बैठक होणार आहे. बुधवारी (१८ मार्च 2026) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक होत असताना, दोन्ही बाजूंनी जोरदार ‘मॅनेजमेंट’ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सदस्यांची सहल, बंदोबस्त आणि गुप्त बैठका यामुळे सांगली जिल्हा परिषदेची सत्ता आता पूर्णपणे ‘थ्रिलर’ टप्प्यात पोहोचली आहे.
जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट)चे सात सदस्य असून, त्यांच्यातही मतभेद स्पष्ट झाले आहेत. आमदार सुहास बाबर व तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपकडून झालेल्या वागणुकीचा मुद्दा ते उपस्थित करत आहेत. दरम्यान, सेनेचे दोन सदस्य महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाले असून, ते सहलीतही सहभागी झाल्याची माहिती आहे. उर्वरित पाच सदस्य मतदानावेळी तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने अंतिम निकालात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.






