Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार (Photo Credit- X)
अंतरिम सरकारने एक विशेष प्रस्ताव मांडला होता, ज्यानुसार सर्व नवनिर्वाचित खासदारांना ‘कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिल’चे सदस्य म्हणून एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणे अनिवार्य होते. या परिषदेचा मुख्य उद्देश संसदीय निवडणुकीसोबतच झालेल्या सार्वमताच्या आधारे संविधानात मोठे बदल करणे हा होता. मात्र, शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीलाच BNP ने हा निर्णय ‘मुलतत्ववादी’ आणि ‘मनमानी’ असल्याचे सांगत त्याला विरोध केला.
BNP चे ज्येष्ठ नेते सलाउद्दीन अहमद यांनी पक्षप्रमुख तारिक रहमान यांच्या उपस्थितीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “पक्षाचे नेते तारिक रहमान यांच्या सूचनेनुसार, आमच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना या सुधारणा परिषदेच्या अर्जावर स्वाक्षरी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जनतेने त्यांना संसदेचे सदस्य म्हणून निवडून दिले आहे, कोणत्याही सुधारणा परिषदेचे सदस्य म्हणून नाही,” असे अहमद यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान
BNP च्या मते, ही तथाकथित सुधारणा परिषद विद्यमान संविधानाचा भाग नाही. संविधानातील कोणताही बदल हा संसदीय चर्चा आणि जनमताच्या घटनात्मक प्रक्रियेतूनच व्हायला हवा, असेही पक्षाने ठामपणे मांडले आहे.
वादाच्या छायेत पार पडलेल्या या सोहळ्यात तारिक रहमान आपल्या पत्नी जुबैदा रहमान आणि मुलगी झाइमा रहमान यांच्यासह उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी ढाका येथे पोहोचले आहेत. ओम बिर्ला यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. हा क्षण दोन्ही देशांमधील लोकशाही मूल्ये आणि संबंध अधिक दृढ करणारा ठरेल.”






