Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका... दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल. सौजन्य : सोशल मीडिया
शनिवारी राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाबाबतच्या (Maharashtra Drought) परिपत्रकावर विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनीही घणाघाती टीका केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंचितही फायदा होणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
तसेच सरकारने गोल गोल न फिरवता 259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आर्थिक मदत मिळणार, हे स्पष्ट करावे असा थेट प्रश्न रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) व राज्यसरकारला केला आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारच्या दुष्काळ निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. त्या म्हणाल्या की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सातबारा कोरा करण्याचे आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अटी व शर्तींमुळे निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नाही. आताच्या दुष्काळ जीआरमध्येही हीच गत झाली आहे.
रोहिणी खडसे यांच्या मते, राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी समोर आणत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या म्हणतात की, शासकीय जीआरमध्ये कर्ज पुनर्गठनाचा उल्लेख आहे, म्हणजे प्रत्यक्षात कोणतीही कर्जमाफी दिलेली नाही. 33.5 % वीजबिल सवलत म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा संपूर्ण दिलासा नाही व शेतकऱ्यांकडून हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी असताना जीआरमध्ये याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याचे रोहिणी खडसे यांनी नमुद केले आहे.
आज राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट समोर असताना, शेतकऱ्यांचे आयुष्य पणाला लागले असताना कुठल्याही अटी आणि शर्तींशिवाय दुष्काळाची घोषणा होईल असे वाटले होते मात्र सरकारने नेहमी प्रमाणे निकष, नियम, अटी आणि शर्ती लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीच्या… pic.twitter.com/XQAANQTpxj — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) September 26, 2026
रोहिणी खडसे यांनी सरकारला थेट 5 सवाल विचारलवे आहेत. तसेच सरकारने गोल गोल न फिरवता खालील मुद्द्यांवर तात्काळ स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
1) 259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणार?
2) मदतीसाठी शासनाकडून किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे?
3) शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी (DBT) द्वारे रक्कम कधी जमा होणार?
4) ‘ट्रिगर-2’ (Trigger 2) चे मूल्यांकन कधी पूर्ण केले जाणार?
5) शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार?
गेल्या 3 महिन्यांत सुमारे 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर आकडेवारी मांडत रोहिणी खडसे यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मागील 2 वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत? सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क माफ न करता संपूर्ण वर्षाची फी माफ करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.






