बीड हत्या प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र यासाठी ओबीसी समाजाचा नकार आहे. यावरुन राजकारण रंगलेले असताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधत आरक्षण न दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीवर मोठा परिमाण होईल, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “लोकसभेच्या वेळेस सांगितले होते आणि आताही सांगत, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा. आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला पश्चाताप होईल. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये. निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. भाजपमधील मराठा नेत्यांना यावर विचार करून फडणवीस यांना याविषयीचा निर्णय घ्यायला लावावा. नाहीतर माझा नाईलाज आहे. फडणवीस यांना समजून सांगा. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका,” असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : “तो येतोय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी” शिवसेना ठाकरे गटाच्या नावाने झळकले बॅनर
पुढे जरांगे पाटील यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याच्या तयारीवर भाष्य केले. यंदा मनोज जरांगे पाटील हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठा समाजासमोर ते आपली बाजू मांडणार असून नारायणगडावर हा जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाजच असेल. नारायण गडावरील दसरा मेळाव्याला राज्यभरातून मराठा समाजाने यावे, जे दुसरे मिळावे घेत आहेत त्यांच्या एसटी रिकाम्या जाऊ द्या. मराठा समाजाची इच्छा होती, की एक तरी मराठा समाजाचा दसरा मेळावा व्हावा आम्हाला राजकारण करायचे नाही, आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा. नाहीतर माझा नाईलाज आहे. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही तर सुपडा साफ होईल,” असा थेट इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.