सौजन्य - नवराष्ट्र टीम
१) ‘दादाची शाळा’ ही संकल्पना कुठून आली?
फूटपाथ, सिग्नल आणि वाड्या वस्त्यांमध्ये राहणारी अनेक मुले शिक्षणापासून पूर्णपणे वंचित आहेत हे आम्हाला जाणवलं. एखादी रात्र झाली तरी मुलं पुर्ण दिवस सिग्नलवर काम करून बसतात, पण शाळेचं दार त्यांच्यासाठी उघडंच होत नाही. मग आम्हाला वाटलं की आपण मुलांना शाळेत आणायचंच का? उलट शाळाच त्यांच्या जवळ नेऊया. तिथून ‘दादाची शाळा’ ही संकल्पना जन्माला आली.
२) या शाळेसाठी प्रेरणा कुठून मिळाली?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या एका वाक्याने आमचं जग बदललं “लोकांचे दुःख समजून घे; तुला आनंद शोधावा लागणार नाही.” ही ओळ मनाला भिडली आणि आम्ही ठरवलं की शिक्षणाच्या माध्यमातून या मुलांसाठी काहीतरी करायचंच.
३) तुमच्या टीममध्ये कोण कोण आहेत ?
संपूर्ण शाळा लोकवर्गणी, स्वयंसेवकांचे योगदान आणि समाजातील दानशूर लोकांच्या मदतीवर चालते. त्यात मी अभिजित पोखरणीकर आणि शुभम माने अम्ही संस्थेचे सहसंस्थापक असून, अबोली राऊत, शुभम भालेकर आणि अंजली शिंदे यांनी शाळांच्या पायाभरणीत मोठा वाटा उचलला आहे. पुण्यासह मुंबई आणि सिंधुदुर्ग येथेही संस्थेची कार्ये विस्तारली आहेत.
४) ‘दादाची शाळा’ कधीपासून सुरू केली?
आम्ही पाच वर्षांपूर्वी शाळेची सुरूवात केली असून, बारावी पास झाल्यावर बारा मित्रांनी एकत्र येऊन सारसबागेजवळ पहिली रात्रशाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त १७ मुलांपासून सुरुवात झाली आणि आजपर्यंत १४ हजार ४२७ मुलांच्या जीवनात प्रकाश पेरता आला.
५) मुलांना जमवण्यापासून ते घडवण्यापर्यंत कोणती आव्हाने आली?
आव्हाने खूप होती फुटपाथवरील स्थलांतरामुळे वर्ग बंद पडणे, जागेची कमतरता, समाजातील काही लोकांचा विरोध, मुलांची शिकण्याची अनिश्चितता, घरचं वातावरण पण प्रत्येक वेळी मुलांच्या डोळ्यांतील चमक आम्हाला थांबू देत नव्हती. प्रशासनाकडून जागा मिळेपर्यंत आम्ही फुटपाथवर, मंदिरांच्या आवारात, पुलाखाली किंवा झाडाखाली वर्ग घेतले. समाजातील अनेक स्वयंसेवक पुढे आले, लोकवर्गणी आणि दानशूरांची मदत मिळत गेली आणि स्वप्न आकार घेत गेलं.
६) मुलांसाठी पुढील ध्येय काय आहे?
आमचं ध्येय मुलांना केवळ अक्षरज्ञान देणं नाही, तर त्यांना स्वावलंबी करिअरच्या मार्गावर नेणं आहे. अधिक मुलींना शिक्षणात पुढे आणणे, करिअर मार्गदर्शन, व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालयापर्यंत पाठबळ देणे, रोजगार निर्मिती आणि उद्योजकता मिळऊन देणे
७) मुलांसाठी नवीन काय करणार आहात?
होय, आम्ही काही नवीन उपक्रम सुरू करत असून, त्यामध्य़े डिजिटल एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी कोर्सेस, कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण, पॉडकास्ट, मीडिया आणि क्रिएटिव कंटेंट निर्मिती, अभ्यासभेटी व इंटरनॅशनल एक्स्पोजर प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम बण्यासाठी मदत करत आहोत. त्याच बरोबर माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम करत आहोत.






