'आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी...'; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
मुंबई : जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेली ही नियमित बैठक होती. आपण घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाते की नाही, याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम असतील, तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचं समाधान होत नसेल, तरी आपण प्रयत्न करत आहोत. त्यांच्या मनात अजूनही काही अपेक्षा असतील, तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या हितासाठी काही निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस समाधानी नसतील, तर माझ्यापुढे पर्याय नाही. ५८ लाख नोंदणी आम्ही ग्रामपंचायतींकडे प्रसिद्ध केली आहे. लोकांनी अर्ज केले आहेत. एकूण ५२० अर्ज आले आहेत. त्यापैकी २४० अर्ज केवळ दाखले काढण्यासाठीचे होते. जशी वस्तुस्थिती समोर येईल, तसे वंशावळीतील बदल असतील तर त्यानुसार दाखले दिले जातील. याबाबत आम्ही यापूर्वीही त्यांना सांगितलं आहे की, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही चर्चा केली आहे. ज्यांनी काहीही दिलं नाही, ते या दोन नेत्यांनी पुढे येऊन काम केलं आहे. ज्यांनी काम केलं, त्यांनाच तुम्ही नावं ठेवत आहात.
दरम्यान, मराठा समाज हे मान्य करणार नाही. सरकार सकारात्मक नसतं, तर विषय वेगळा होता. गेल्या २५-३० वर्षांत असे चांगले निर्णय झाले नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरक्षण घालवलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं पाहिजे. त्यांनी अल्टिमेटम द्यावा की नाही, हा त्यांचा निर्णय आहे.
आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…
तसेच समितीला मर्यादित मुद्दे देण्यात आले आहेत. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले नाहीत. आज मराठवाड्यात साडेतीन लाख मुलांनी SEBC चे दाखले काढले आहेत. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. आता शिष्टमंडळ जाणार नाही. शेवटी त्यांनी सरकारची भूमिका समजून घेतली पाहिजे.
आता पुढचा मार्ग मनोज जरांगे पाटील काढतील
सरकार एक पाऊल पुढे येत असेल, तर त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. आमच्याकडे जे पर्याय होते, ते सर्व करून झाले आहेत. यामध्ये राजकारण आणायचं नाही. प्रश्न सुटला पाहिजे. आज न्यायमूर्ती शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून या नोंदणी शोधल्या जात आहेत. आता पुढचा मार्ग मनोज जरांगे पाटील काढतील.






