
नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा (Photo Credit- X)
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील मतभेदांवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या भाजपच्या प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. राज्यात सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतके धास्तावले आहेत की त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवले होते. आता भाजपच्या आदेशानंतरच त्यांनी या नगरसेवकांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयातील सर्व फाईल्स सध्या मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) अडवून ठेवल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सरकारने आणलेल्या ‘सार्वजनिक सुरक्षा कायद्या’वर पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “सरकार दावा करते की जंगलातील नक्षलवाद संपला आहे, मग शहरी नक्षलवादाचा बागुलबुवा कशासाठी उभा केला जात आहे? या कायद्याच्या नावाखाली सामान्य लोकांना शहरी नक्षलवादी घोषित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा सरकारचा घाट आहे. सरकारने यामागचा आपला खरा हेतू जनतेसमोर स्पष्ट करावा.”
आगामी महापौरपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना नाना पटोले यांनी स्पष्ट केले की, भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे. “भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्याकडे पैसा आणि सत्तेची ताकद असल्याने ते नगरसेवकांची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना रोखण्यासाठी आम्हाला जर उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू घ्यावी लागली, तर आम्ही ती नक्कीच घेऊ. भाजपला रोखणे हेच आमचे प्राथमिक ध्येय आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या सर्व प्रकरणावर दिल्लीतील हायकमांड अंतिम निर्णय घेईल, परंतु राज्यातील भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजकारणातील धार्मिक ध्रुवीकरणावर टीका करताना पटोले म्हणाले, आज देशात काही लोक भगव्याबद्दल बोलतात, तर काही हिरव्याबद्दल राजकारण करतात. मात्र, काँग्रेस पक्ष केवळ तिरंग्याबद्दल बोलतो. तिरंगा हाच आमचा सन्मान आहे आणि हीच आमची विचारधारा आहे.