फोटो - ट्वीटर
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी कामाला लागली आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभा वाढल्या आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वावविवाद सुरु आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. यामुळे प्रचारासोबत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील राजकारण आणि विकासकामांवरुन अजित पवार यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. समरजीतसिंग घाटगे यांच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आधी शहरातील कारभारी वेगळा असल्याने मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते. आले तरी कार्यक्रम घेतला नाही. मला कोणाच्या कामात ढवळा-ढवळ करायला आवडत नाही. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
अशा धमक्या तुम्ही कोणाला देता?
पुढे त्या म्हणाल्या की, एका ताटात जेवल्यास त्या व्यक्तीचं ऋण आयुष्यभर विसरू नये. तो व्यक्ती सोबत असो वा नसो, कारण त्याने आपल्या सुख-दुःखात साथ दिलेली असते. सध्याचे राजकारण बघता ते बदलायला हवं. माझ्या आईला देखील सध्याचे राजकारण आवडत नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे सध्या नेते करत आहेत. एक दिवस पोलिसांना घरी पाठवा मग बघतो.. हे कोण सांगणार?. हा देश संविधानावर चालतो. कुठल्या अदृश्य शक्तीच्या मनमानीवर चालत नाही. अशा धमक्या तुम्ही कोणाला देता? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी नेत्यांना केला आहे.
लोकसभेच्या कटू आठवणी
बारामती लोकसभेची निवडणूक देशभरामध्ये रंगली होती. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या असल्यामुळे पवार कुटुंबामध्येच ही लढत झाली. प्रतिष्ठेची झालेल्या या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. यावेळीची आठवण करुन देत खासदार सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभेदरम्यान प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती. एक माणूस माझ्यासोबत नव्हता. आम्हाला बूथ कमिटीदेखील चोरून बनवावी लागत होती. अनेक ठिकाणी बूथ कमिटीला माणूस मिळत नव्हता. अनेक दशकांचे ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीच्या आम्ही घरी गेलो होतो. त्या व्यक्तीने आमचा तोंडावर दरवाजा बंद केला होता. मतांच्या माध्यमातून त्यांनी राग व्यक्त केला, अशा लोकसभा निवडणूकींच्या कटू आठवणी सुप्रिया सुळे यांनी सांगितल्या.






