नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
कणकवली/ भगवान लोके: कणकवली म्हणजे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला. आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभेतून निवडून येणारच, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्यात प्रचारसभा सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर महायुतीची सभा कणकवलीत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी उपस्थित राहावं अशी विनंती नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती. याबाबात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माध्य़मांसमोर या सभेबाबात खुलासा केला आहे.
महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
कणकवलीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचारसभेबाबत बोलताना देवेद्र फडणवीस म्हणाले की, कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार,माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते, मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली. असेही येथे जेथे नितेश राणे हे नाव येते, तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे, आणि स्वतः नारायण राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही.
पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, नितेश यांनी केलेलं जे काम आहे, ते कामच त्यांना निवडून आणण्याकरता पुरेसे आहे.कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, मी त्यांना म्हटलं की, तुम्ही निवडून तर येणारच आहात. मग माझी एक सभा वाया कशाला घालवता ?पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो. असो सभा रद्द झाली, तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी कायम आहेत .आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी महाराष्ट्रातील कडवा नेता आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्य़ावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
याव्यतिरीक्त पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, आमदार नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.विधानसभेतील त्यांची भाषणं अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की, मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या. संघटित शक्तीसाठी राणे विधानसभेत असलेच पाहिजे. तसंच नितेश राणेना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील लढत अतीतटीची होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भाजपा महायुतीचे नितेश राणे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे संदेश पारकर उभे आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत कणकवलीकर कोणाला कौल देणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता कणकवलीत येणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.