काँग्रेसने 'शाह' यांना दिला 'शह'! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती
काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले लियाकत शाह यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची लॉटरी लागली आणि नाराज झालेले शाह यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले . यानंतर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी रविवारी सायंकाळी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या नाट्यमय घडामोडी संदर्भात चर्चा झाली. यानंतर सोमवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शाह यांचा राजीनामा मंजूर करीत काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी यांची नियुक्ती जाहीर केली.
खेर्डी येथील प्रकाश साळवी यांनी खेर्डी ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह उपसरपंच पदाची जबाबदारी भूषवत खेर्डी गावच्या विकासात योगदान दिले आहे. तितकेच सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाची देखील यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत काँग्रेस वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आता तर काँग्रेसने चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून साळवी यांच्यावर विश्वास दाखवला आहे .
याबाबत ते म्हणाले की, काँग्रेसने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.
तसेच काँग्रेसच्या चिपळूण शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती करून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याला काँग्रेसने सन्मान दिला आहे. या दोन्ही निवडी बाबत समाधान व्यक्त केले जात असून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे असताना माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहणे चुकीचे आहे. यामुळे पक्षाकडून कारवाई होणे गरजेचे होते. ते झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.






