रवींद्र जडेजाने रचला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
Ravindra Jadeja takes 50 Test wickets against South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दोन बळी घेऊन रवींद्र जडेजाने एक मोठा कारनामा केला आहे. या दोन बळींसह रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण करण्याची किमया साधली आहे.
या कामगिरीसह रवींद्र जडेजाने भारताच्या टॉप गोलंदाजांच्या यादीत एंट्री केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये किमान ५० दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना बाद करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. गुवाहाटीमध्ये सुरू असलेला सामना हा जडेजाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ११ वा कसोटी सामना असून त्याने आतापर्यंत १९ डावांमध्ये ५० बळी टिपण्याची कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक बळींचा विक्रम कुंबळेच्या नावावर जमा आहे. त्याच्या १८ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत, या भारतीय महान फिरकीपटूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ कसोटी सामने खेळले आणि ८४ फलंदाजांना मंगहरी पाठवले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये एकूण १० गोलंदाजांनी ५० किंवा त्याहून अधिक बळी टिपले आहेत. यामध्ये पाच भारतीय गोलंदाज आणि पाच दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा समावेश असून या यादीमध्ये अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, अश्विन आणि जडेजा यांचा नंबर आहे. दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन, मॉर्न मॉर्केल, कागिसो रबाडा, शॉन पोलॉक आणि अॅलन डोनाल्ड या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समावेश आहे.रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या नऊ कसोटी सामन्यांमध्ये १७ डावांमध्ये ४४ बळी मिळवले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी ५४९धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात फक्त काही षटके बाकी आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपला डाव २६०/५ धावांवर घोषित केला असून भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात टोनी डी झोर्झीने सर्वाधिक ४९ धावा केल्या आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.






