फोटो - सोशल मीडिया
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आगामी निवडणुकांमध्ये आमदारांना पाडण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत जरांगे पाटील यांना थेट आव्हान दिलं आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी वेळ पडल्यास जीव देण्याची आणि जीव घेण्याची भाषा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी, “जीव घेऊ नका आणि देऊही देऊ नका, मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे,” असं म्हटलं.
मनोज जरांगे पाटील यांना आमदार पाडण्याचा आत्मविश्वास असल्याचं ते सांगत आहेत. मात्र, निवडणूक प्रत्यक्ष लढवली असती तर त्याची ताकद दिसली असती, असा टोला दरेकर यांनी लगावला.
त्यांनी पुढे महायुतीच्या निवडणूक विजयाचा दाखला दिला. जरांगे पाटील यांनी विरोध करूनही जनतेने महायुतीला निवडून दिलं, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आमदार पाडण्याची क्षमता आधीच सिद्ध झालेली आहे का, असा सवाल करत दरेकरांनी पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर उमेदवार उभे करा, असं थेट आव्हान दिलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
बावनकुळे हे राज्यातील विविध समाजघटकांना सोबत घेऊन काम करत असल्याचं सांगत दरेकर यांनी त्यांचं समर्थन केलं. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याची भूमिका बावनकुळे यांच्या निर्णयांमधून दिसते, असा दावा त्यांनी केला. कोणत्याही समाजासोबत दुजाभाव केला नसल्याचंही दरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रवीण दरेकर यांनी टीका केली. निवडणुकीच्या काळातच काही व्यक्ती चर्चेत येतात आणि कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका घेतात, असा टोला त्यांनी लगावला.
समाजासाठी काम करताना केवळ माध्यमांसमोर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा समाजासाठी रचनात्मक काम आणि ठोस दिशा देणं महत्त्वाचं असल्याचं दरेकर म्हणाले. “केवळ मीडियासमोर आणि एकमेकांसमोर भुंकायचं, हे मला मान्य नाही,” असं म्हणत त्यांनी हाके यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला भाजप आमदारांकडून मिळणारा हा थेट प्रतिसाद पाहता, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






