Congress to Protest: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार! पृथ्वीराज चव्हाणांकडून राज्यभर जनआंदोलनाची घोषणा
सातारा जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. देशातील लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचे काम सध्याचे सरकार करत असून, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार असल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि जनतेवरील आर्थिक भाराविरोधात काँग्रेस व्यापक आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इथेनॉल धोरणावर भाष्य करताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांचे इथेनॉल प्रकल्प असल्याचा उल्लेख केला. देशात इथेनॉलचा वापर १५ ते २० टक्क्यांपर्यंतच योग्य असून, एखाद्या विशिष्ट कुटुंबाला लाभ होईल अशा घाईगडबडीच्या निर्णयांना सरकारने प्रोत्साहन देऊ नये, अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले की, बाजारभाव हमीभावापेक्षा कमी नसतील तर हमीभाव देण्याची गरज नाही, मात्र सरकारची सध्याची कर्जमाफी योजना फसवी असून त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही.
माहिती अधिकार कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकारासारखा महत्त्वाचा कायदा आणण्यात आला होता. मात्र सध्याच्या सरकारला हा पारदर्शक कायदा नको असून, त्यांच्या कारभारातील अनेक गोष्टी जनतेसमोर येतील, या भीतीपोटी कायद्यात बदल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सार्वजनिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांनी रस्ते बांधकामांमध्ये ४० टक्के कमिशन घेतले जात असल्याचे सांगितले. अयोध्येतील सोन्याच्या कथित चोरीचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रभावी चौकशी होत नसल्याने हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले. आरक्षणाच्या विषयावर बोलताना त्यांनी आरक्षणाचा उद्देश समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे हा असल्याचे सांगितले. मात्र अपेक्षित न्याय मिळत नसेल तर त्यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने मोठे केलेले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने आम्हाला काय दिले, असा प्रश्न उपस्थित करतात. अशा नेत्यांबाबत योग्य निर्णय जनता घेईल, असेही ते म्हणाले.
युवकांनी केवळ पक्षीय राजकारणात न अडकता आंदोलनातून समाजाशी जोडले गेले पाहिजे. युवक सर्वच स्तरावर सक्रिय असून त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आज माझा पदग्रहण सोहळा पार पडला. आमच्याकडे सहकारी साखर कारखाने नसले तरी काँग्रेसचे विचार आणि कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे. येत्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार आणि कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा आमचा संकल्प आहे.”






