प्रियांका चतुर्वेदी ठाकरे सेना सोडणार (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मोदी सरकारच्या महिला आरक्षणासाठी मतदारसंघ पुनरर्चनेच्या मांडलेल्या १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचे प्रियांका चतुर्वेदी यांनी समर्थन केले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा याला ठाम विरोध होता. तरीही याचे समर्थन चतुर्वेदी यांनी केले. त्यामुळेच आता त्या उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात आला होता. पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेत गेल्याने चतुर्वेदी यांना संधी मिळू शकली नाही. त्यानंतर चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे चतुर्वेदी या ठाकरेंची साथ सोडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून संसदेत वर्चस्व राखणाऱ्या भाजपप्रणित आघाडीला शुक्रवारी मोठा धक्का बसला. महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळू शकली नाही. या विधेयकासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मात्र, बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडल्याने विधेयक नामंजूर झाले.
वेगळी भूमिका घेतली
या घडामोडीनंतर उबाठा शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. पक्षाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विधेयक फेटाळल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त करत पक्षाच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले असताना, चतुर्वेदी यांनी मात्र या विधेयकाचे समर्थन केले आणि ते मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दुःखाचा दिवस असल्याचे म्हटले.
युद्धावरून सरकारला केले होते लक्ष्य
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर भाष्य करताना, प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटले की, ही बैठक बोलावण्यात विलंब झाला आहे. ही बैठक बोलावून सरकारला (Central Goverment) आता नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.






