'माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे'; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?, (Photo Credit- X)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी भाजपमध्येही लवकरच ज्वालामुखी फुटेल. कोणताही पक्ष कायम सत्तेत राहत नाही, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
राज म्हणाले की, उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या बंडाबाबत माध्यमांनी विचारले असता त्यांनी केंद्रात कोणाची सत्ता आहे, असा प्रश्न उपस्थित केला. हे खासदार थेट भाजपमध्ये जाण्याऐवजी शिंदे गटात का जात आहेत? यावरून केंद्रात कोणते राजकारण सुरू आहे, हे दिसते. अमित शहा २०२९ ची तयारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मनसेचे आंदोलन घराघरांत पोहोचते, पण मतपेटीपर्यंत नाही, अशी खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे. अन्यथा तेही कदाचित अशाच प्रकारे विकले गेले असते. देशावर ६० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे ते पाहा.
RTI नियमांवर अण्णा हजारे आक्रमक; बदल मागे न घेतल्यास फडणवीस सरकारविरोधात उपोषणाचा इशारा
स्वाभिमान संपला की उरतात जिवंत प्रेत
राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजकीय फायद्यासाठी फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. ५०-५० कोटी रुपयांत लोकप्रतिनिधी विकले जात आहेत. स्वाभिमानाचा मृत्यू झाला आहे. स्वाभिमान संपला की माणूस जिवंत प्रेत बनतो, असे ते म्हणाले. विरोधकांना कमकुवत करण्यासाठी विविध डावपेच रचले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेचे आमदारही आता फुटणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार बंड करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत. या घटनेनंतर काही तासांत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.






